दिव्यांगांना मिळणार स्वतंत्र शिधापत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:03+5:302021-01-25T04:36:03+5:30
राज्यातील बहुसंख्य दिव्यांग बेरोजगार आहेत, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका ...
राज्यातील बहुसंख्य दिव्यांग बेरोजगार आहेत, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधावाटप कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्याअनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तत्काळ देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अधिनियम २०१३ नुसार राज्यात ७००.१६ लक्ष लाभार्थीसंख्या निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटांत विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांना व बीपीएल गटातील सर्व लाभार्थ्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आले होते.
शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेला अन्नधान्याचा लाभ जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात व त्यांची नावे त्याच शिधापत्रिकेत नमूद असूनदेखील पात्र दिव्यांग व्यक्ती अन्नधान्य मिळण्यापासूून वंचित राहत होत्या. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना धान्य मिळावे, यासाठी दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.