डाकसेवकांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:40 PM2018-06-05T22:40:56+5:302018-06-05T22:41:11+5:30
मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सेवानिवृत्ती वेतन लागू करण्यात यावा. कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा देण्यात यावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने २२ मे पासून संपाला प्रारंभ केला आहे. पंधराव्या दिवशीही हा संप नियमितरीत्या सुरु असून देशातील २ लाख ७० हजार ग्रामीण टपाल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील टपाल सेवेवर होत आहे. संपामुळे इंडीयन पोस्ट पेमेंट बँक, सुकन्या समृद्धी योजना, डायरेक्ट बेनीफीट ट्रांसफर (आर.डी.), ग्रामीण टपाल जीवन विमा पोस्टल बचत खात्यांची कामे खोळंबली आहेत.
डाक कार्यालयातून येणाऱ्या जाणाºया, टपालांच्या बॅग डाक सेवकांच्या अनुपस्थितीने कार्यालयातच पडून आहेत. टपाल वितरणाचे काम बंद आहे. परिणामी नागरिकांची पोस्टाने येणारी महत्वाची कागदपत्रे पोस्टातच अडकून पडली आहेत. या संपामुळे टपाल सेवा विस्कळीत झाली असून संपूर्ण कामकाज रखडलेले असताना १५ दिवसानंतरही केंद्र सरकारने या संपावर कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसोय होत आहे.