पवनीतील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:56+5:302021-08-19T04:38:56+5:30
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असून, येथील बाह्यरुग्ण तपासणीसाठी मोठी रांग पाहावयास मिळते. रुग्णालयात आयुषअंतर्गत नियुक्त ...
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असून, येथील बाह्यरुग्ण तपासणीसाठी मोठी रांग पाहावयास मिळते. रुग्णालयात आयुषअंतर्गत नियुक्त केलेले डॉक्टर, तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले डॉक्टरांनी स्वतःचे खासगी दवाखाने थाटल्यामुळे रुग्णालयात अनुपस्थिती पाहावयास मिळते. रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सध्या एकाच कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू असून, दवाखान्यात आकस्मिक रुग्ण आल्यास बाह्यरुग्ण तापासणाऱ्या ‘त्या’ कंत्राटी डॉक्टरलाच धाव घ्यावी लागते. त्यामुळे सकाळपासून रांगेमध्ये असलेल्या रुग्णांची गैरसोय होताना पाहावयास मिळते.
पवनी येथील ग्रामीण रुग्णालय जुने असून, येथे ५० खाटांची मंजुरी प्राप्त आहे. त्याचप्रमाणे येथे मल, मूत्र, रक्त, तसेच अन्य तपासण्या करण्यासाठी लॅब व टेक्नेशियनची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, येथील डॉक्टर दवाखान्यात असलेल्या लेबॉरटरीमधून रक्त तपासणी करण्याची शिफारस न करता काही मर्जीतील डीएमएलटीधारकांकडून तपासणीकरिता स्वतःच फोन लावून कमिशनचा गोरखधंदा सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या नातेवाइकांनी स्वमर्जीने अधिकृत पॅथाॅलॉजिस्टकडून रक्त चाचणी रिपोर्ट आणला तरी तो अवैध ठरवून पुन्हा मर्जीतील खासगी लॅब टेक्नेशियनकडून रक्त चाचण्या करावयास भाग पाडतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात होत असलेली अनियमितता, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे तसेच मल, मूत्र, रक्त तपासणीसाठी खासगी लॅबधारकांना न बोलविता रुग्णालयातच तपासण्या करण्यात याव्यात, बाह्यरुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात नियुक्त डॉक्टरांना बसण्याची ताकीद देण्यात यावी, येथील खाटांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.