शिष्यवृत्ती परीक्षेपासून २८ विद्यार्थी वंचित
By Admin | Published: February 7, 2015 12:16 AM2015-02-07T00:16:54+5:302015-02-07T00:16:54+5:30
शिक्षण विभागाच्या माध्यमातून शनिवारी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा घेण्यात येत आहे.
भंडारा : शिक्षण विभागाच्या माध्यमातून शनिवारी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेतील २८ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र न मिळाल्याने ते वंचित राहणार आहे. यामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येते. शनिवारी सकाळी ही परिक्षा सर्वत्र घेण्यात येत आहे. शहरातील संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेने २८ विद्यार्थ्यांना परिक्षेत प्रवेश घेता यावे, यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, उद्या परिक्षा असतानाही शिक्षण विभागाने या परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र शाळेत पाठविलेले नाही. याबाबत शाळेने शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, शिक्षण विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. शिक्षण विभागामुळे या २८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. शिष्यवृत्ती परिक्षा शनिवारी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास पुर्ण केला आहे. मात्र त्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागणार. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळू गजभिये यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी )