गुणवत्ता यादीत येऊनही आदेशापासून वंचित
By admin | Published: May 31, 2017 12:44 AM2017-05-31T00:44:10+5:302017-05-31T00:44:10+5:30
महावितरण कंपनीतर्फे वीजतंत्री या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु गुणवत्ता यादीत नावे आल्यानंतरही संबंधित प्रशिक्षणार्थींना रूजू करण्याचे आदेश मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महावितरण कंपनीतर्फे वीजतंत्री या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु गुणवत्ता यादीत नावे आल्यानंतरही संबंधित प्रशिक्षणार्थींना रूजू करण्याचे आदेश मिळाले नाही. पात्र उमेदवारांना कामावर रूजू करून घ्यावे, अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे.
इलेक्ट्रिशियन, वायरमन व कोपा शाखेतील ९६ प्रशिक्षणार्थ्यांनी महावितणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे. १० एप्रिलला भंडारा वीज वितरण कार्यालयातर्फे निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती. कागदपत्राची पडताळणी १२ ते १५ एप्रिल दरम्यान करण्यात आली. पडताळणीच्या वेळी १० ते १५ दिवसात कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले होते. पंरतु अजूनपर्यंत कंपनीकडून आदेश देण्यात आले नाही. जे उमेदवार मुलाखतीमध्ये अपात्र झाले आहेत व ज्यांना गुणवत्ता यादीमध्ये कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी कंपनीकडे फेरविचार करण्यासंबंधी अर्ज सादर केले आहे. असा उमेदवारांचा विचार न करता गुणवत्ता यादीतील प्राविण्य सुचीनुसार येत्या आठ दिवसात कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी आहे. मागणी पुर्ण न झाल्यास वीज कार्यालयासमोर बेमुदत उपोषण प्रारंभ करु असा, इशारा या प्रशिक्षणार्थ्यांनी दिला.
विद्युत कपंनी प्रशिक्षणार्थी भरती पारदर्शकपणे घेण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश येताच भरती प्रक्रिया पूर्ण करु.
- सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता महावितरण भंडारा.