बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:09 PM2023-04-05T12:09:11+5:302023-04-05T12:09:48+5:30

बाम्हणी-शिवनी शिवारातील शेतकरी हवालदिल

Discharge of water from Bawanthadi distribution stopped; cracks in agriculture, Paddy crop under threat | बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

googlenewsNext

तुमसर (भंडारा) : बावनथडी आंतरराज्य धरणातून उन्हाळी धान व इतर पिकांना पाणी सिंचनाकरिता विसर्ग करण्यात येत आहे; परंतु बाम्हणी- शिवनी शिवारात वितिरिकेतील पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या परिसरातील सुमारे २० ते २२ शेतकऱ्यांचे धानपीक सुकायला सुरुवात झाली आहे. काही शेतात पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाची क्षमता प्रकल्पातून होते, हा दावा येथे फोल ठरत आहे.

बावनथडी प्रकल्पामुळे तुमसर व मोहाडी तालुका सुजलाम् सुफलाम् झाल्याच्या दावा संबंधित विभाग व शासनाकडून केला जातो; परंतु प्रत्यक्षात उन्हाळी धान पिकांना नियमित पाणी दरवर्षी मिळत नाही, तर कुठे एका वर्षाच्या अंतराने पाण्याच्या विसर्ग सिंचनाकरिता केला जातो. ही शेती उंचावर असल्याचा दावा संबंधित विभाग करते; परंतु आधी नियोजन करूनच प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत कसे जाईल, याचा अभ्यास करूनच वितरिकांचे बांधकाम केले जाते. बामणी- शिवनी शिवारात बावनथडी प्रकल्पांतर्गत वितरिकांचे जाळे असूनही परिसरात शेतीला पाणी मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. बाम्हनी- शिवनी शिवारातील २० ते २२ शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक लावले. सुरुवातीला त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले; परंतु आता पाण्याची गरज असताना पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धान पिकाने माना खाली घातल्या असून, शेतात भेगा पडायला सुरुवात झाली आहे. चार ते पाच दिवस या धानाला पाणी मिळाले नाही, तर हे संपूर्ण धान वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाणी विसर्ग सुरू असल्याचा दावा

परिसरातील शेतकऱ्यांनी बावनथडी सिंचन विभागाच्या अभियंत्यांना याबाबत माहिती दिली असता, प्रकल्पातून पाण्याच्या विसर्ग नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वितरित करणारे कर्मचारी वितरिकेची पाहणी नियमित करतात; परंतु त्याकडे ते लक्ष देत नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी चिंताग्रस्त असून, सिंचनाकरिता पाणी मिळाले नाही, तर धानाच्या लागवडीचा खर्च निघणार नसून, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी शेतात पोहोचत नाही. संबंधितांना कळविल्यानंतरही ते लक्ष देत नाही. आता शेतातील पीक वाळायला सुरुवात झाली असून, भेगा पडणे सुरू झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यास जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांची राहील.

- नंदलाल मुटकुरे, शेतकरी, देव्हाडी

Web Title: Discharge of water from Bawanthadi distribution stopped; cracks in agriculture, Paddy crop under threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.