कुंपणात वीज प्रवाह सोडताय; पथक करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:08 PM2024-10-30T14:08:16+5:302024-10-30T14:09:56+5:30

Bhandara : वीज चोरीसोबत गंभीर गुन्हा देखील

discharges electric current into the fence; The team will take action | कुंपणात वीज प्रवाह सोडताय; पथक करणार कारवाई

discharges electric current into the fence; The team will take action

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
वन्यप्राण्यांपासून होणारी पिकांची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असतात. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांबरोबरच शेतात कामासाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणास स्पर्श करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे.


याशिवाय वीजही आकडे टाकून चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास विद्युत कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 


मागील काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतकऱ्यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीज चोरीबरोबर सदोष मनुष्यवध यासारख्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर करण्याचा आणि महावितरणकडून भरपाई मागण्याचा कल देखील दिसून येत आहे. 


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आकडे टाकुन शेतशिवारात विजेचे सापळे रचले जात आहेत. शेतमालाचे वन्यप्राण्यांपासुन रक्षण व्हावे हा यामागील हेतु असला तरी नागरिकांच्या दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या आणि प्राणहानीच्या घटना घडत आहेत. 


पथक ठेवणार करडी नजर

  • वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकोडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी, तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवा- रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
  • सदर प्रकार आढळला तर संबंधित शेतकऱ्यावर विद्युत कायदा २००३ च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावि- तरणने कळविले आहे. यावर संपूर्ण जिल्ह्यात भरारी पथक निगरानी ठेवणार आहे.


शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या... 
कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्याला यापुढे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. संभाव्य जीवितहानीची शक्यता असते. याबाबत फौजदारी गुन्हाही नोंदविला जाऊ शकतो, याची दखल घेत शेतकऱ्यांनी स्वतः या प्रकारामध्ये सहभागी होऊ नये. तसेच कोणी सहभागी होत असल्यास त्याला तसे करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: discharges electric current into the fence; The team will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.