कोका विश्रामगृहाच्या लाकडी साहित्यांची विल्हेवाट!
By admin | Published: August 22, 2016 12:29 AM2016-08-22T00:29:41+5:302016-08-22T00:29:41+5:30
ब्रिटिशकालीन कोका विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात आले. यावेळी निघालेले लाकडी सागवाण साहित्य भंडारा येथे पोहचले.
तुमसरातील घराला लागले साहित्य : वनक्षेत्राधिकारी मेश्राम यांचेवर संशयाची सुई
प्रशांत देसाई भंडारा
ब्रिटिशकालीन कोका विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात आले. यावेळी निघालेले लाकडी सागवाण साहित्य भंडारा येथे पोहचले. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या साहित्यांची पसस्पर विल्हेवाट लावताना तुमसरातील एका मर्जी सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या घराला लावल्याची चर्चा आता वनविभागात रंगू लागली आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या वनसंपदेच्या अखत्यारित येथील निसर्ग सौंदर्य तथा वन्यप्राण्यांचा मुक्त वावर आहे. ब्रिटिशांनी असे निसर्गसौंदर्य जवळून बघता यावे यासाठी सन १९१८ मध्ये कोका अभयारण्यात टुमदार विश्रामगृह बांधले. असे हे विश्रामगृह शतकोत्तरीत आहे. या विश्रामगृहाचा काही भाग जीर्णावस्थेत असल्याने मागील वर्षी वनविभागाने विश्रामगृहाची देखभाल दुरूस्ती करण्याचे काम हाती घेतले. यात ब्रिटिशकालीन काळात विश्रामगृहाला लावलेल्या मौल्यवान सागवान लाकडांचे साहित्य काढून त्याऐवजी अत्याधुनिक पध्दतीचे साहित्य लावण्यात आले. मागील वर्षी या विश्रामगृहाच्या दुरूस्तीचे हाती घेतलेले काम यावर्षी पूर्ण झाले. या कामादरम्यान विश्रामगृहाच्या जुन्या बांधकामातून सागवाण लाकुड फाटा साहित्य, सिमेंट सिट व डोंगी निघाली. हे सर्व साहित्य कोका येथील विश्रामगृह परिसरात होते. वनक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी हे सर्व साहित्य त्यांच्या अधिकाराचा वापर करून भंडारा येथील त्यांच्या वसाहतीत उतरविण्याचे आदेश त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना दिले. तेथून यातील सागवाण साहित्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
वसाहतमागे साहित्य उतरविणे गुलदस्त्यात
ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला सागवाण लाकडांचा वापर करण्यात आलेला होता. यातून निघालेल्या साहित्यात चौकटीसह दरवाजे, लाकडी खिडकी, लाकडी मुंडे, लाकडी कैची, लाकडी बत्ता, सागवाण राप्टर, सिमेंट सिट, सिमेंट डोंगी यांचा समावेश आहे. हे साहित्य १८ मार्चला भंडारा वनविभागाच्या वसाहत मागे उतरविण्यात आले. साहित्य दोन घनमिटर असून त्याची किंमत दीड लाखांच्या घरात असल्याचे समजते.
भंडारा मार्गे तुमसरात पोहचले साहित्य
लाकडी साहित्य कोका येथून भंडारा येथील वनविभागाच्या वसाहतीमागे उतरविण्यात आले. तेथून काही साहित्य ज्यात चौकटीसह दरवाजा, खिडकी, काही लाकडी फाटे व अन्य साहित्य हे परस्पर तुमसर येथील मर्जी सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या घराला लावण्यासाठी पाठविण्यात आले. शासकीय साहित्य घराला लावण्यात आल्याची गंभीर बाब आता समोर आल्याने यात सहभागी अधिकारी व कर्मचारी सारवासरव करीत आहेत.
वनक्षेत्राधिकारी मेश्राम यांच्या लेखी आदेशानुसार एमएच ३५-११०४ या शासकीय वाहनाने सिमेंट सिट ११७, सिमेंट डोंगी ५४, सागवाण राप्टर १०, लाकडी खिडकी ०४, चौकटसह दरवाजे ०८, लाकडी मुंडे १०, लाकडी कैची ०३, लाकडी बत्ता ९२ असे ३५० नग साहित्य भंडारा येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ३५ नग सिमेंट सिट व दोन नग चौकटीसह दरवाजे परत मिळाले. उर्वरित साहित्यांचा वापर कुठे झाला याची माहिती नाही.
- डब्ल्यू. आर. खान, वनपाल, कोका सहक्षेत्र.
विश्रामगृहाचे निघालेले लाकडी साहित्य काही सडलेले होते. काही चांगले साहित्य स्वत:च्या शासकीय सदनिकेला लावले. काही वाळके लिपीक यांच्या सदनिकेला लावले, तर काही वनविभागाच्या भंडारला लावले. उर्वरित साहित्य कोका येथील वनरक्षक डोंगरे यांच्या शासकीय सदनिकेला लावण्यासाठी कोका येथे पाठविण्यात आले आहे. लाकडी साहित्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली नसून सर्व महिती चुकीचा आहे.
- संजय मेश्राम, वनक्षेत्राधिकारी, भंडारा.