परिसंवादात सखींच्या प्रश्नांची उकल
By admin | Published: June 28, 2016 12:41 AM2016-06-28T00:41:30+5:302016-06-28T00:41:30+5:30
लोकमत सखी मंचतर्फे येथील मंगलम् सभागृहात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘टॉक शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे येथील मंगलम् सभागृहात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सखी, युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जया व्यास प्रमुख वक्ता कुमुदिनी कडव, डॉ.राधिका कोतवाल व तुमसर सखी विभाग प्रतिनिधी रितू पशिने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आरोग्यपूर्ण आहार विषयावर डॉ.राधिका कोतवाल यांनी सखींना मार्गदर्शन करताना सांगितले की, पोषक आहार नियमित सेवन करून त्यांची वेळ पाळली पाहिजे. कमीत कमी दोन तासांच्या अंतराने आहार घ्यायला हवा. मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ देताना त्यामध्ये पोषक तत्वांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करावा. तसेच मुलांना शाळेत जाण्याच्या आधी दूध व ड्राय फ्रुट्स देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यात स्टॅमिना टिकून राहील व अभ्यासात लक्ष लागेल.
सगळ्यांनी दिवसातून कोणतेही एक तरी फळ नक्कीच खायला पाहिजे. आरोग्यपूर्ण सकस आहार घेतल्यास दैनंदिन जीवनात कोणताही तास उद्भवणार नाही. उलट असलेले त्रास नाहिसे होतील. अॅसीडीटी, बीपी, चक्कर येणे यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येईल व निरोगी सुदृढ जीवन जगता येईल.
नाते माय लेकीचे या विषयावर कुमुदिनी कडव यांनी सखींना मोलाचे मार्गदर्शन केले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी.
आईची महती सांगताना आई व मुलीचे नाते किती एकरुप असते. मोठी बहिण, मैत्रीण आणि वेळ आल्यास आईची मुलगी पण होऊन जाते. पुढे बोलले आई जेवढे मुलीवर विश्वास करते तेवढेच मुलींनी आईवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट मग ती भावनिक, शारीरिक, सामाजिक असो लपवू नये.
आईच खऱ्या अर्थाने मुलीला समजवून योग्य वळण देते व मार्गदर्शन देते.
कुमारिका अवस्थेतील मुलींना साध्या शब्दात कडव यांनी समस्यांची उकल करून दिली.
कार्यक्रमात उपस्थित सखींनी त्यांना पडलेले आहार विषयक प्रश्न डॉ.कोतवाल तर मुलींच्या संबंधित प्रश्न कुमुदिनी कडव यांना विचारले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जया व्यास यांनी देखील उपस्थितांना आपल्या मुलांबरोबर कसे वागावे यांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे तर आभार सीमा नंदनवार यांनी मानले. सुहासिनी अल्लडवार, कल्पना डांगरे, मंगला डहाके, मंदा पडोळे, रेखा गिऱ्हेपुंजे, संध्या रामटेके, मंगला क्षीरसागर, मनिषा रक्षिये, प्रतिभा खोब्रागडे, सोनाली तिडके, अल्का खराबे, शालीनी सूर्यवंशी, श्वेता वाडीभस्मे, कांता बांते, वैशाली झाडे, वंदना दंडारे, किरण भावसार, स्नेहा वरकडे व दिगांबर बारापात्रे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)