सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:44 PM2017-09-23T23:44:24+5:302017-09-23T23:44:34+5:30
एकीकडे अनियमित पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती आणि दुसरीकडे नोटबंदी व जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर वाढत असून आॅनलाईन शॉपिंगमुळे लहान व्यापाºयांचा व्यवसाय मोडकळीस आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकीकडे अनियमित पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती आणि दुसरीकडे नोटबंदी व जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर वाढत असून आॅनलाईन शॉपिंगमुळे लहान व्यापाºयांचा व्यवसाय मोडकळीस आला असून त्यांच्यासमोर रोजगाराराचे संकट निर्माण झाले आहे. मागील तीन वर्षामध्ये बेरोजगारी वाढली असून सरकारविषयी असंतोष आहे. येणाºया निवडणुकीत हा असंतोष दिसून येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
अनियमित पावसामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ५० टक्के रोवणी झालेली नाही, ही परिस्थिती निवडणुकीसाठी उपयुक्त नाही. असे असताना ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येत आहेत. मुंडीपार येथे प्रस्तावित भेल प्रकल्पाचे काम पुर्णत: ठप्प आहे. गोसेखुर्द प्रकल्पाला निधी मिळाला नाही. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी धरणाचे निरीक्षण करून अधिकचा निधी देऊन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
अडीच लाख हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाच्या सूची हटविण्यात आले आहे. नागपुरच्या नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीला प्रदूषित करीत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पिण्याचे पाणी दूषित होत आहे. दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात ५,५०० कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत निविदा काढण्यात आलेले नसल्याचा आरोप केला. राज्याच्या सत्तेतील भाजपा-शिवसेना हे केवळ एकमेकांवर आरोप करतात परंतु सत्ता कुणीही सोडत नसल्याचे सांगितले. खासदार नाना पटोले यांच्या सरकार विरोधी वक्तव्यावर टिप्पणी करण्याचे टाळून ज्या लोकांनी निवडून दिले आहे, त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्याची गरज असून नाकर्तेपणा दाखविण्याची गरज नाही.
गुजरातमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांना खारिज करीत पटेल म्हणाले, आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते असून पक्षाचे कार्यक्षेत्र व विस्तार करण्याचाच आपला प्रयत्न राहील. महाराष्ट्रानंतर गुजरात असा राज्य आहे, जिथे पक्षाला मोठा करता येऊ शकते. सौराष्ट्र, उत्तर गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे पक्ष संघटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यात पक्ष व संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहील. सरकारच्या कार्यप्रणालीमुळे तेथील लोकांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंङे उपस्थित होते.