रस्ता बांधकाम कंत्राटावरून उद्भवला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:24+5:302021-02-06T05:06:24+5:30
शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. मात्र काम पूर्ण करण्याऐवजी पुन्हा नवीन कामे त्याच कंत्राटदाराला देण्यात आली. ...
शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. मात्र काम पूर्ण करण्याऐवजी पुन्हा नवीन कामे त्याच कंत्राटदाराला देण्यात आली. याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री बोरकर तेथे गेल्या. जुने काम पूर्ण केल्यावरच नवीन कामाला हात लावा, असे म्हटल्यावरून वाद झाला. त्यावेळी या कंत्राटदाराच्या मजुरांनी नगरसेविका आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत शाब्दिक वाद झाला. हा वाद भंडारा पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. जयश्री बोरकर यांच्या वॉर्डातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत असून, सध्या हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे.
बॉक्स
विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न
नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी शहराच्या विकासासाठी विविध कामांचे नियोजन केले आहे. मात्र काही नगरसेवक विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम करीत आहेत. म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या रस्ता बांधकामादरम्यान नगरसेविकेच्या पतीने जेसीबी चालकाला दम भरला. त्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. प्रभाग क्रमांक ८ म्हाडा कॉलनी ते हनुमाननगरपर्यंत रस्ता डांबरीकरण व सिमेंट नालीचे एक कोटी ६३ लाख रुपयांचे काम सुरू असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. विकास कामात अडथडे आणले जात असल्याने नागरिकांतही नाराजी वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.