वाद भोवला; पोलीस कर्मचारी निलंबित
By admin | Published: June 25, 2016 12:27 AM2016-06-25T00:27:02+5:302016-06-25T00:27:02+5:30
शासकीय कामात अडथळा आणने, मद्य प्राशन करून धक्काबुक्की करणे या कारणाहून एका पोलिस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी निलंबित केले.
पोलीस दलात चर्चा : ‘गुड’ शेरा कोणत्या कामाचा? आरोप-प्रत्यारोप
भंडारा : शासकीय कामात अडथळा आणने, मद्य प्राशन करून धक्काबुक्की करणे या कारणाहून एका पोलिस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी निलंबित केले. रमेश गोविंद शेंडे असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची भंडारा पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. २७ वर्षांच्या कारकिर्दीत २२ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या या पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्याला पोलीस दलाची प्रतीमा मलीन केल्याचा आरोप असला तरी क्षुल्लक कारणाहून त्यांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेष बाब म्हणजे या प्रकरणात आजपर्यंत रमेश शेंडे यांचे बयाण घेण्यात आलेले नाही. किंबहुना त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रारही स्वीकारण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत असे की, १५ मे २०१६ च्या रात्री ८ वाजताच्या सुमारास रमेश शेंडे, लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत सफाई कामगार रमेश वाघाये हे दोघेही पोलीस ठाण्याबाहेरील टपरीवर चर्चा करीत होते. याचवेळी लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस शिपाई मोहन वलथरे तिथे आले. तसेच रमेश वाघाये यांना साहेबांच्या आदेशान्वये कुलरमध्ये पाणी घालणे व पिण्याचे पाणी आणण्याचे काम सांगितले. याचवेळी रमेश शेंडे व मोहन वलथरे याच्ंयात काही कारणाहून वाद निर्माण होऊन उपरोक्त प्रकार घडला. वलथरे यांच्या लेखी तक्रारीहून तथा वैद्यकीय अहवालावरून लाखनी पोलीस ठाण्यात शेंडे यांच्याविरूद्ध भादंविच्या ३५३, ५०४, ५०६, ३३२ सहकलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शेंडे यांनी केलेले कृत्य हे पोलीस दलासारख्या शिस्तप्रिय विभागास शोभणारे नाहीत, आदी ठपका ठेऊन २० मे रोजी त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले.
लोकशाही पद्धतीत आपआपली बाजू ठेवण्याचा समान अधिकार दिला जातो. मात्र तसे या प्रकरणात झालेले दिसून येत नाही.
एक महिन्यापेक्षा जास्त कलावधी लोटला असला तरी रमेश शेंडे यांची बाजू नोंदवून घेण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे त्यांनी लिहीलेली तक्रारही पोलिस ठाण्यात स्विकारण्यात आलेली नाही. ज्या कारणाहून घटना घडली त्याचे संपूर्ण खापर शेंडे यांच्यावर फोडण्यात आले. रमेश वाघाये यांची साक्ष घेतल्यास सत्य काय ते बाहेर येईल, असे सर्वांचेचे म्हणने आहे.
चूक कोणाची आणि शिक्षा कुणाला?
अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास त्यांनी केला. लाखनीतील आकबानी हत्याकांड असो की जिल्हाधिकारी कार्यालयातील शाही फेकण्याचे प्रकरण. मुंबई येथे दहशहवादी हल्यात शहीद झालेले अशोक कामठे यांच्या पथकात काम करणारे रमेश शेंडे यांनी भंडारा जिल्ह्यातील जवळपास दहा पोलीस ठाण्यात काम केले आहे. शेंडे यांना कामाचा प्रचंड अनुभव असताना त्यांच्याच प्रकरणात त्यांची बाजू ऐकून न घेणे ही बाब लोकशाही विचारांना घातक ठरणारी आहे. तेव्हा पोलीस दलाची शान कमी होत नाही काय? घटनेच्यावेळी ज्या साहेबांनी कामानिमित्त ज्यांना पाचारण केले व नंतर घटनेची नोंद घेण्यात आली, तेव्हा एक जबाबदार अधिकारी म्हणून रमेश शेंडे यांची बाजू का घेण्यात आली नाही, यासारख्या अन्य मुद्यांची जोरदार चर्चा आहे. शेंडे यांच्याकडून चुक झाली असेल-नसेल ही बाब ठरविणे पोलिस विभागाचा कर्तव्येचा भाग असला तरी चुक कोणाची आणि शिक्षा कुणाला अशीच चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
या प्रकरणात शेंडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. अभ्रद व्यवहार केल्याचा कारणाहून त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
चंद्रशेखर चकाटे
पोलिस निरिक्षक, लाखनी.