तोंडेश्वर विकासापासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:57 PM2018-12-21T22:57:51+5:302018-12-21T22:58:07+5:30
जीवनदायी वैनगंगेच्या नदीपात्रात तोंडेश्वर येथे निसर्गरम्य बेट आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श असलेले हे बेट मात्र विकासापासून कोसो दूर आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या बेटाचा विकासच झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : जीवनदायी वैनगंगेच्या नदीपात्रात तोंडेश्वर येथे निसर्गरम्य बेट आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श असलेले हे बेट मात्र विकासापासून कोसो दूर आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या बेटाचा विकासच झाला नाही.
स्वातंत्र्यापुर्वी हा परिसर गंगाधरराव चिटणवीसांच्या अखत्यारीत होता. त्यांनी वैनगंगा नदी तिरावर वाडा बांधून वास्तव्य केले. पूर्वी वारंवार येत असलेल्या महापूराने वैनगंगेचा प्रवाह सदर स्थळापासून दुसऱ्या बाजुने प्रवाहित झाला आणि त्या ठिकाणी निसर्गनिर्मित बेट तयार झाले. ईटान, पवना बुज., खातखेडा या गावांच्या सीमावर हे बेट आहे. याठिकाणी अद्यापही वाड्याचे अवशेष आढळतात. १९९४ च्या महापुरातही वाड्याची जागा बुजली नव्हती, असे वृद्ध सांगतात.
याठिकाणी अडकीने कुटुंबियासह पाच-सहा कुटुंब वास्तव्याला होते. मात्र वाघाच्या धुमाकुळाने या कुटुंबांनी आपले बस्तान गुंडाळून गावात आश्रय घेतला. मात्र या बेटावर अन्नपुर्णादेवी, तथागत गौतम बुद्ध, हनुमान मंदिर, शिवलिंग आणि संत श्रावणजी बाबांचे समाधी आहे. सर्वधर्मीयांचे प्रतिक असलेल्या या बेटाच्या दोन्ही बाजूला वैनगंगेचा मंजुर प्रवाह वाहतो. अशा या निसर्गनिर्मित बेटावर सुविधा निर्माण झाल्यास आर्थिक सुभत्ता येवू शकते. याठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. काही वर्षापुर्वी बंद पडलेले धार्मिक कार्य पुन्हा सुरू करण्याचा संकल्प शैलेंद्र शेंडे यांच्याकडून प्रेरणा घेवून विरलीचे सरपंच जितेंद्र पारधी यांनी आयोजित केला होता. गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. तर भंद चारूदत्त यांच्याहस्ते तथागतांच्या मुर्तीचे पवित्रानपाठ करण्यात आले. सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी जैवविविधता उद्यान विकसित होवू शकते.