आदिवासी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप करा
By admin | Published: December 22, 2015 12:43 AM2015-12-22T00:43:28+5:302015-12-22T00:43:28+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणारी सन २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ती सन २०१५-१६ लोटत असताना अजूनही मिळालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उत्तम कळपते यांची मागणी
करडी (पालोरा) : आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणारी सन २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ती सन २०१५-१६ लोटत असताना अजूनही मिळालेली नाही. सबरी घरकूल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मागील वर्षापासून घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही. आदिवासी विकास प्रकल्पातर्फे संगणक, टंकलेखन आदिचे प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. वर्ग सुरु करण्यात यावे, उपरोक्त मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी कोका क्षेत्राचे जिल्हा परीषदेचे सदस्य उत्तम कळपते यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे.
केंद्र सरकार मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीने लाभ दिले जातात. परंतु जिल्ह्यात सन २०१४-१५ ची शिष्यवृत्ती सन २०१४-१५ लोटत असतांनाही अजूनपर्यंत मिळालेली नाही. वाटपात मोठया प्रमाणात विलंब झालेला आहे. मागील वर्षापासून आदिवासी विद्यार्थी लाभापासून वंचित आहे. चालू सत्रामध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी मदत होते. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक पाठबळ मिळते. परंतु मागील वर्षापासून आदिवासी विद्यार्थी वंचित आहेत. तत्काळ शिष्यवृत्तीचे वाटप होणे गरजेचे आहे.
आदिवासी बांधवांना निवाऱ्याची अडचण भासू नये, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सबरी घरकुल योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मागील वर्षापासून घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. पात्र लाभार्थ्यांना वारंवार कागदपत्रे मागवून त्रास दिला जात आहे.
या अगोदरच लाभार्थ्यांनी योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज अर्जासोबत जोडलेले आहेत. त्याचबरोबर वारंवार कागपत्रांची पूर्तता करुनसुद्धा विभाग व त्यांचे कर्मचारी कामांकडे दुर्लक्ष करित आहेत.
लाभार्थ्यांना विनाकारण वेठीस धरले जात आहे. लाभार्थ्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा, एकात्मिक विकास प्रकल्पातर्फे देण्यात येणारे संगणक व टंकलेखनाचे प्रशिक्षण वर्ग तत्काळ सुरु करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात जिल्हा परीषद सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुजाता फेंडर, राजेंद्र चव्हाण, योगेश कळपते, नागेश कळपते, रवि पंधरे, गणेश वलके, राम आहाके, हितेश सेलोकर आदींचा समावेश होता. (वार्ताहर)