सर्वच दिव्यांगांना करणार साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:52 PM2018-02-24T22:52:23+5:302018-02-24T22:52:23+5:30
जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगाना आवश्यक त्या सर्व साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून एकही लाभार्थी यातून सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगाना आवश्यक त्या सर्व साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून एकही लाभार्थी यातून सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले. जिल्हा रूग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग साहित्य वितरण व मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य रामराव कारेमोरे, दिलीप उके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिता बढे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चाचेरकर, रवी वानखेडे, तिलक वैद्य, सदानंद इलमे, डॉ.बावनकर, बाळा अंजनकर, दिव्यांगाची अॅम्बेसिडर अश्वकला चौधरी उपस्थित होते.
यावेळी डॉ.फुके म्हणाले, महिला रूग्णालयाचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांमधील ज्यांचे हात किंवा पाय व्यवस्थित चालत नाही त्यांना बॅटरी आॅपरेटेड सायकल वाटप करण्याचा आपला मानस आहे. कृत्रिम अवयव देण्यासाठी लवकरच कॅम्प घेण्यात येणार आहे. या शिबिरात पाच हजार दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करायचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल व दिव्यांगांना सर्व प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, मागील वर्षभरापासून दिव्यांगांसाठी विविध शिबिर राबविण्यात येत आहे. प्रमाणपत्र आधारकार्ड वितरण करण्यात आले. त्याच बरोबर या शिबिराद्वारे ज्याज्या अपंगांना जेजे साहित्य आवश्यक आहे ते वितरित करण्यात येणार असून उपचार, शस्त्रक्रियासुद्धा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे समन्वय योग्य असल्यामुळे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. जिल्हा विकास निधीतून आरोग्य सेवेला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माड्युलर ओटी मशिनचे, रक्तदान शिबिर, आरोग्य प्रदर्शनीचे उदघाटन करून दिव्यांगाना व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, रवी वानखेडे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांनी केले. संचालन डॉ.शांतीदास लुंगे यांनी केले. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.