जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कार्यकारी अभियंत्यांना फैलावर
By Admin | Published: May 28, 2016 12:34 AM2016-05-28T00:34:09+5:302016-05-28T00:34:09+5:30
जिल्हा परिषदेची जलसंधारण समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवारची औढावा बैठक आज शुक्रवारला घेण्यात आली.
३० जूनपर्यंतचा अल्टीमेटम : लघु सिंचाई विभागातील गैरप्रकार
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषदेची जलसंधारण समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवारची औढावा बैठक आज शुक्रवारला घेण्यात आली. जिल्हा परिषदच्या बैठकीला अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखविल्याने ही बैठक ‘आॅल इज वेल’ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवारच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी चांगलेच फौलावर घेतले. त्यांना जलयुक्त शिवारचे कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा ‘अल्टीमेटम’ देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाच्या अखत्यारित १ हजार १५४ मामा तलाव आहेत. या तलावांचा गाळ उपसा सुमारे २५० वर्षांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे देखभाल दुरूस्ती व खोलीकरण केल्यास जलस्त्रोत वाढू शकते. यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. मात्र, लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी कामे न करता काही आलेल्या निधीची गरज नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देऊन निधी परत पाठविला. काही कामांचे जानेवारी महिन्यात निविदा मागविल्या. परंतु कामांचे वर्कआॅर्डर अद्याप दिलेले नाही. याबाबत लोकमतने प्रकरण लावून धरले. पराते यांनी त्यांच्या कार्यकाळात लघु पाटबंधारे विभागात अनियमितता केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
जलयुक्ंत शिवारसाठी अल्टीमेटम
जलयुक्त शिवार योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे. लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांच्या दिरंगाईमुळे कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुक्रवारला आढावा बैठक बोलविली. यात लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. लघु सिंचाई विभागाची जलसंधारणाची सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे अल्टीमेटम धीरजकुमार यांनी पराते यांना दिले. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आजच्या बैठकीत पराते यांना चांगलेच धारेवर धरले. ३० जूनपर्यंत कामे आटोपा अन्यथा कारवाईला सामोर जा, असा गर्भित इशारा दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आटोपताच पराते यांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व अभियंत्यांना मंगळवारी बैठकीला उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
जलसंधारण सभेला पाठ
जिल्हा परिषदची जलसंधारण समितीची शुक्रवारला आढावा बैठक होती. मात्र, या बैठकीचे सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबईला बैठकीला गेल्यामुळे त्यांची जबाबदारी लघु सिंचाई विभागाचे पराते यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला गेल्याने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मैदमवार यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. अधिकारी व काही पदाधिकारीही या बैठकीला नसल्याने औपचारीकता म्हणून ही महत्वाची बैठक आटोपती घेतली.