डाव्या कालव्याची वितरिका फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:47 PM2019-08-04T22:47:08+5:302019-08-04T22:47:26+5:30
आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे.
आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे. त्यामुळे आकोटच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यावर असलेल्या आकोट जवळील पुलावरुन खाली कोसळत असल्याने डावा कालव्यास मोठे भगदाड पडले. याकडे डावा कालवा धरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
नेरला उपसा सिंचन योजनेच्या आकोट वितरिकेचे काम चालू आहे. ते अपूर्ण असल्याने पावसाळ्यात वितरिकेला तडे गेले. वितरिकेचे पाणी शेतातून आकोटच्या रस्त्यावर आले आहे. यामुळे धान पिकांची नासाडी झाली आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यात पडत असल्याने कालव्याचा एका बाजूस खोल खड्डा पडला आहे. जिथे वितरिकेचे पाणी कालव्यात पडते तिथून २०० फूट अंतरावर डावा कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास डावा कालव्याला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपकालव्याची वितरिका फुटल्याने धानपीक पाण्याखाली
मासळ : गोसे बु. धरणाच्या डावा उपमुख्य कालव्याची वितरिका घरतोडा शिवारात फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक बुडाले असून धानपीक सडल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. गेल्या तीन चार दिवसापासून मासळ, घरतोडा, खैर, ढोलसर, सरांडी बु. परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिसरातील नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात पाणी भरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यातच कालव्याची पार फुटल्याने नहरातील पाणी संपूर्ण शेतशिवारात पसरला आहे. त्यामुळे सुमारे २५ एकरातील धानपिकाला नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी घरतोडा येथील शेतकरी स्वप्नील शेंद्रे, ऋषी ब्राम्हणकर, प्रल्हाद फुंडे, राजेश रामटेके, होमराज कठाणे, प्रमोद कठाणे, लोमेश्वर फुंडे, देवदास कठाणे, कारु फटे, विनोद फटे, ऋषी फुंडे, लालचंद देशमुख, गोपाल देशमुख आदींनी केली आहे.