आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 09:49 PM2020-09-19T21:49:54+5:302020-09-19T21:50:55+5:30
तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३० वर्षांपासून या कालव्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील बावनथडी आणि चांदपूर प्रकल्पाचा आयुष्य संपलेल्या कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे वितरण केले जात आहे. यामुळे ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. परंतु निधीचे कारण पुढे करून कालव्याची डागडूजी केली जात नाही.
तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३० वर्षांपासून या कालव्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आज या कालव्यांमध्ये ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून अनेक ठिकाणी कालव्यातून पाणी वाहून शेतात शिरण्याचे प्रकार घडत आहेत.
दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे चांदपूर होय. ब्रिटीशकालीन प्रकल्प सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. परंतु या प्रकल्पाच्या कालव्यांची प्रचंड दूरावस्था झाली आहे. दोन दिवसांपुर्वी मुख्य कालव्याला भगदाड पडून हजारो लीटर पाणी व्यर्थ गेले होते. दरवर्षी दोनही प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. परंतु त्यानंतरही कालव्यांची अवस्था दयनिय आहे.
बावनथडी व चांदपूर प्रकल्पासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग स्वतंत्र आहे. तेही परिश्रम घेत आहे. परंतु आयुष्य संपलेल्या प्रकल्पाचे कालवे आणि वितरिका सुस्थितीत ठेवण्यासाठी निधीची तरतूद केली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वाहून जात आहे.