जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराला यंदाही ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:08+5:302021-09-04T04:42:08+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबरला पूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबरला पूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी देश, राज्य तथा जिल्हा पातळीवर शिक्षण क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्य केलेल्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन यथोचित सत्कार केला जातो. मात्र, भंडारा जिल्ह्यात यावर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराला ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र आहे. प्रस्ताव कमी आल्याने कार्यक्रमही होणार नाही, असे सूतोवाच शिक्षण विभागाने केले आहे.
शिक्षण विभागात प्राथमिक व माध्यमिक गट मिळून एकूण सात प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. किमान या प्रस्तावांचा सन्मान करून शिक्षकांचा मान राखला गेला पाहिजे, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. गतवर्षी म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने कार्यक्रम झाला नव्हता. परंतु, त्यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांची नावे जाहीर करण्यात आली होती. या वेळेस मात्र तालुका स्थळाहून प्रस्तावच त्या प्रमाणात आले नसल्याने पुरस्कार कसा द्यायच्या या विवंचनेत शिक्षण विभाग सापडल्याचे दिसून येते.
प्राथमिक व माध्यमिक गटातून फक्त सात प्रस्ताव आले आहेत. यात प्राथमिक गटातील चार, तर माध्यमिक विभागांतर्गत तीन प्रस्ताव आल्याची माहिती आहे. प्रत्येक तालुक्यातून एक असे दोन्ही विभाग मिळून चौदा पुरस्कार वितरित केले जातात. एका तालुक्यातून किमान दोन प्रस्ताव तरी येणे अपेक्षित असते. मात्र, चार तालुक्यातून प्रत्येकी एक व माध्यमिक गटातून तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पुरस्कार वितरण संबंधात अडचण निर्माण होईल, म्हणून कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याचे समजते. कार्यक्रमासाठी शासनाकडून निधीची तरतूद असते, तर दुसरीकडे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना पगारात एक वेतनवाढ देण्यात येत होती. आता तेही बंद झाले आहे. त्यामुळेही प्रस्ताव सादर करण्यात शिक्षक उदासीन दिसून येतात. प्रस्ताव तयार करायला पाच ते सात हजारांचा खर्च येतो तो वेगळाच असतो. किंबहुना ज्यांनी प्रस्ताव सादर केले त्यांचा मान राखून पुरस्कार वितरण केले पाहिजे, अशी शिक्षकांची भावना आहे. आगामी दिवसात तरी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आयोजित करावा, अशी चर्चाही शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे.
कोट बॉक्स
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव फार कमी आले आहेत. विविधांगी विचार करूनच कार्यक्रम घ्यावा की नाही यावर मंथन सुरू आहे. सध्या तरी ५ तारखेला कार्यक्रम होणार नाही.
- मनोहर बारस्कर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा
कोट बॉक्स
५ सप्टेंबर हा शिक्षकांसाठी अविस्मरणीय असा दिवस असतो. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या गुरुजनांचा गौरव केला जातो. किमान ज्यांनी प्रस्ताव सादर केले त्यांचा मान राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाच सप्टेंबरला होणारा कार्यक्रम रद्द केला जाऊ नये याची काळजी घेत शिक्षकांचा सन्मान करावा, अशी शिक्षकांची मागणी आहे.
- रमेश सिंगनजुडे, जिल्हाध्यक्ष,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा