जिल्हा प्रशासनाने केला आदर्श शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:50 PM2018-09-05T22:50:13+5:302018-09-05T22:50:32+5:30
ज्ञानार्जनासोबतच समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात सहा प्राथमिक, एक माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ज्ञानार्जनासोबतच समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात सहा प्राथमिक, एक माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजतापासून सुरू झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, समाजकल्याण सभापती रेखाताई वासनिक, महिला व बालकल्याण सभापती रेखाताई ठाकरे, बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. पाच्छापुरे, उपशिक्षणाधिकारी मोहन चोले अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद आदी उपस्थित होते. यावर्षी प्राथमिक शिक्षण विभागातून लाखनी पंचायत समितीच्या केसलवाडा (पवार) शाळेचे शिक्षक प्रमोद हरिदास खेडीकर, लाखांदूर पंचायत समितीच्या मेंढा येथील विनोद बक्षीराम ढोरे, पवनी पंचायत समितीच्या विरली खं. येथील यशवंत रामाजी लोहकर, मोहाडी पंचायत समितीच्या जांब येथील विजयकुमार भादुजी चाचेरे, तुमसर पंचायत समितीच्या वाहने शाळेचे अरुणकुमार यादवराव बघेले आणि साकोली पंचायत समितीच्या चांदोरी येथील संजय गुलाबराव नंदेश्वर यांचा अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व भेट साहित्य असे या पुरस्काराचे स्वरूप होते. माध्यमिक विभागातून लाखनी पंचायत समितीच्या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे सहाय्यक शिक्षिका सारिका ज्ञानेश्वर दोनोडे तर विशेष शिक्षक गटात तुमसर पंचायत समितीच्या ढोरवाडा येथील मंजुषा ढोमण बोदेले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारमूर्ती शिक्षकांनी ज्ञानदानासोबतच विविध उपक्रम राबविले आहेत.
या सोहळ्यात शिक्षक पतीपत्नींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पाच्छापुरे यांनी तर संचालन शिक्षिका स्मिता गालफाडे व सिद्धार्थ चौधरी यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी मोहन चोले यांनी मानले.
गिरी व गायधने सातारा येथे गौरवान्वित
भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रामराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील ओमप्रकाश बाबूराव गायधने यांनाही बुधवारी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.