जिल्हा प्रशासन होणार ‘पेपरलेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:40 AM2018-08-20T00:40:07+5:302018-08-20T00:40:40+5:30
शासकीय कार्यालयातील दप्तरदिरंगाईचा अनुभव न घेतलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याचा अनेकांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र आता ई-आॅफीसच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस होत आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय कार्यालयातील दप्तरदिरंगाईचा अनुभव न घेतलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याचा अनेकांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र आता ई-आॅफीसच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस होत आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून चंद्रपूर, औरंगाबाद, रत्नागिरी नंतर पेपरलेस होणारा भंडारा हा चौथा जिल्हा ठरणार आहे.
प्रत्येक नागरिकाचा प्रशासकीय कार्यालयाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो. मात्र त्या ठिकाणी अनेकांना वाईट अनुभवाची उदाहरणे आहेत. याठिकाणी दिलेल्या तक्रारीवर केव्हा योग्य निर्णय होईल याचा नेम नसतो. परंपरागत कार्यशैलीत कागदाला कागद लावून फाईल तयार केली फाईल या टेबलवरून त्या टेबलवर फिरत असते. यातच बराच अवधी जातो. काम रखडले जाते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ई-आॅफीस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २० आॅगस्ट २०१३ रोजी यासाठी आदेश निर्गमित केला. त्यानुसार भंडारा जिल्हा प्रशासनाने ई-आॅफीससाठी पुढाकार घेतला आहे. कामकाज गतीमान, प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी ई-आॅफीस करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु परंपरागत पद्धतीने काम करण्याची सवय असलेले अधिकारी, कर्मचारी सुरुवातीला यासाठी तयार नव्हते. त्यांचे मत परिवर्तन करून ही प्रणाली त्यांना कशी सहज आणि सोपी आहे हे समजावून सांगितले. भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेवून पेपरलेस कार्यालयाची संकल्पना समजवून सांगितली. त्यानंतर तांत्रिक तयारी सुरु झाली. अधिकारी - कर्मचाºयांची संगणकीकृत माहिती गोळा करण्यात आली. मुंबईच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सर्व्हरवरील जागेसाठी पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा सेतू समितीतून निधीही उपलब्ध करून घेण्यात आला. दोन महिन्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व्हर जागा उपलब्ध करून दिली. आधिकारी-कर्मचाºयांना माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांनी दोन दिवस प्रशिक्षण दिले. १ आॅगस्ट या महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला पहिली फाईल ई-आॅफीसमधून बाहेर पडली.
पेपरलेस प्रणालीत संबंधिताने तक्रार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सादर केला की त्याची ई-फाईल तयार केली जाते. तक्रारदाराला त्याचा एसएमएस जातो. त्यात नोंदणी क्रमांक दिला जातो. या क्रमांच्या आधारे तक्रारदार आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो. तसेच संबंधित अधिकाºयाच्या पोर्टलमध्ये ही सर्व माहिती अवघ्या काही वेळातच पोहचते. काम किती दिवसात करायचे याचाही त्यावर अवधी असतो. त्यामुळे दाखल झालेल्या तक्रारीवर टोलवाटोलवी करण्यास कुठेही जागा नसते. येवढेच नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुटीचा अर्ज कागदावर घेणे आता बंद करण्यात आले आहे. या प्रणालीचा वापर करूनच सुटीचा अर्ज दिला जातो. अधिकारी कर्मचारी किती वाजता आला याचीही माहिती या प्रणालीतून क्षणात कळते. ही प्रणाली या पूर्वी चंद्रपूर, औरंगाबाद, रत्नागिरी या जिल्ह्याने स्वीकारली. आता भंडारा जिल्हाही यासाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन पेपरलेस होवून तक्रारींचा निपटारा वेळेत होईल.
वर्षभरात वाचणार पाच हजार रिम कागद
जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या अधिनस्थ असलेल्या सर्व कार्यालयामध्ये वर्षाला पाच हजार रिम कागद लागतो. मात्र आता पेपरलेस प्रणालीमुळे कागदाचा खर्च वाचणार आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. २० हजार कागदांसाठी एक झाड तुटते. भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस झाल्याने वर्षभरात हजार ते १२०० झाडांची कत्तल थांबेल आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासनाने पेपरलेस होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या प्रणालीमुळे जनतेची कामे निर्धारित वेळेत केली जातील. कामकाजात पारदर्शकता येवून गतीमानता वाढेल.
-विजय भाकरे,
निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा.