जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 05:00 AM2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:36+5:30
खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा मुदतीच्या आत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची मात्र नकारघंटाच आहे.
खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जून महिन्याच्या अखेरीस ३०० कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्यात येईल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केला आहे.
पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकरी सभासदांना थेट कर्ज दिले जाईल. कुठलाही शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणार नाही याची दक्षता घेऊ.
-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक