डबघाईस आलेल्या संस्थेतील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 12:35 AM2016-05-08T00:35:16+5:302016-05-08T00:35:16+5:30
अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे.
सुनील फुंडे यांचा मदतीचा हात : शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के दराने कर्ज
भंडारा : अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी अवसायनात सापडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
सन २०१३ मध्ये कमी कर्ज वसुलीच्या निकषाखाली शासनाने अवसायनात काढलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन त्यांच्यामार्फत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा मानाने जगण्याचा अधिकार सुनिल फुंडे यांनी मिळवून दिला.
आजतागायत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील ७४० सभासदांकडे ४०६.९७ लाख रूपयाची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना नवीन पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने जिल्ह्यातील कोणतीही बँक उपलब्ध करून देऊ शकत नाही.
या परिस्थितीची माहिती शासन व प्रशासनाला असतानाही ते काहीच करू शकले नाही. मात्र ही व्यथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी अवसायनात आलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील चौकाचौकात आवाहान करणारे फलक लावले. यावरच न थांबता अधिनिस्त असणाऱ्या कर्मचारी व, अधिकाऱ्यांना गावांगावात जावून सभा घेण्याविषयी सभा घेण्याचे निर्देश दिले.
थकीत शेतकरी सभासदांना शासन निर्णयाप्रमाणे शुन्य टक्के व्याज दराने जिल्हा बँक कर्जपुरवठा करायला तयार आहे तेव्हा बिनव्याजी एकरी १६,५०० रूपये कर्जपुरवठा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अवसायान संस्थेतील शेतकरी सभासद नवीन चालू पिक कर्ज वाटपाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा ताठमानेने नवीन खरीप हंगामात उत्तम प्रकारे शेती करू शकतील असा मानसही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)