जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वलथरेसह अनेकांचा राकाँत प्रवेश
By admin | Published: February 2, 2015 10:59 PM2015-02-02T22:59:57+5:302015-02-02T22:59:57+5:30
साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सोमवारी साकोली
साकोली : साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सोमवारी साकोली येथील पक्षाच्या मेळाव्यात प्रवेश केला. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्षात खिंडार पडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रस श्रेष्ठींनी माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोली विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. शेवटी काहींनी खुलेआम राष्ट्रवादी काँग्रेसचे कामही केले. या सर्वप्रकरणाची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेतली नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या निवासस्थानी खा. प्रफुल पटेल आले असता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, माजी तालुका अध्यक्ष सुरेश कापगते, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शेंडे, अर्बन बँकेचे संचालन पप्पु गिऱ्हेपुंजे, लाखनीचे माजी सभापती सुखदेव नागलवाडे, माजी सरपंच उमेश मेश्राम यांच्यासह लाखांदूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याच महिन्यात साकोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यातही साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्याने शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व सुरेश कापगते यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)