जिल्हा दुग्ध संघाचा दोन कोटींचा प्रकल्प मंजूर
By admin | Published: March 30, 2017 12:31 AM2017-03-30T00:31:59+5:302017-03-30T00:31:59+5:30
जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला रॅशन बॅलेंसिंग कार्यक्रमाअंतर्गत १ कोटी ७७ लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. .....
सुनील फुंडे यांचे प्रतिपादन : जिल्हा दुग्ध संघाची सभा
भंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला रॅशन बॅलेंसिंग कार्यक्रमाअंतर्गत १ कोटी ७७ लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. जिल्हा दुग्ध संघाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी हे होते. यावेळी सुनिल फुंडे म्हणाले, रॅशन बॅलेंसिंग प्रोग्रामअंतर्गत १५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये लोकल रिसर्च पर्सन त्याच गावातील व्यक्तीला काम दिले जाणार आहे. त्यांचा मेहनताना दीड ते दोन हजार रूपये असून त्याला एक लॅपटॉप दिला जाणार आहे. सदर प्रकल्प चालविण्यासाठी एक तांत्रिक अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि दोन कृषी अधिकारी असतील. जे शेतकऱ्यांना कृषी व दुग्ध व्यवसाय व इतर माहिती देतील. या प्रकल्पासाठी ४,५०० लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. एका लाभार्थ्याला दोन जनावरे देण्यात येणार असून ९ हजार जनावरे लाभार्थ्यांना दिले जाईल. लाभार्थी गावातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे सांगितले.
यावेळी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी म्हणाले, जानेवारी महिन्यात केंद्र शासनाने केलेल्या कार्यशाळेत देशातील दुग्ध संघाचे संचालक उपस्थित होते. त्यावेळी कृषी पशुसंवर्धन विभागाच्या सचिवानी दुधाचा पुरवठा दुग्ध संघालाच करावा, असे आदेश काढले होते. त्याचे पालन दुग्ध संघ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दुग्ध उत्पादक संघाचे संचालक उपस्थित होते. संचालन व्यवस्थापक करण रामटेके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)