जिल्हा कचेरीच्या व्हरांड्यात तरुण शेतकऱ्याला मारहाण

By admin | Published: September 23, 2015 12:41 AM2015-09-23T00:41:51+5:302015-09-23T00:41:51+5:30

शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असताना एका शेतकऱ्याच्या मुलाला चार इसमांनी जबर मारहाण केली.

District farmer beat up young farmer in verandah | जिल्हा कचेरीच्या व्हरांड्यात तरुण शेतकऱ्याला मारहाण

जिल्हा कचेरीच्या व्हरांड्यात तरुण शेतकऱ्याला मारहाण

Next

शेतीचा वाद : चौघांविरूध्द पोलिसात तक्रार दाखल
भंडारा : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असताना एका शेतकऱ्याच्या मुलाला चार इसमांनी जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात घडली. या घटनेमुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
जितेंद्र हरिचंद्र येंचेलवार (२८) रा.कुरूडा ता. मोहाडी असे जखमी शेतकरी पुत्राचे नाव आहे. घटनेदरम्यान सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठताच हरिचंद्र येंचेलवार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गावालगतची एक शेती खरेदी केली होती. मात्र, त्या शेतीवर जाण्यासाठी शेता बाजुच्या शेतकऱ्यासोबत वाद झाला होता. या वादाची दाद मोहाडी तहसीलदारांकडे मागण्यात आली. तेथून हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आले होते.
याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांच्या दालनात आज मंगळवारला दोन्ही शेतकऱ्यांना तारखेवर बोलाविण्यात आले होते. यासाठी हरिचंद्र येंचेलवार हे मुलगा जितेंद्रसह उपस्थित झाले होते. पडोळे यांच्या दालनात दोन्ही शेतकऱ्यांना पुढील तारीख देण्यात आली. त्यानंतर हरिचंद्र हे मुलासह बाहेर आले असता सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धनराज कवडू चिंतनवार, शंकर कवडू चिंतनवार, ग्यानीराम राजेराम लकडेस्वार व भैय्या परसराव ठवकर यांनी दालनाबाहेर जितेंद्रला गाठून वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने या चौघांनीही जितेंद्रला तिथेच बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे जितेंद्रने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली.
सोबत असलेले जितेंद्रचे वडील मुलाच्या मदतीला धावून आले. मात्र, चौघांनीही त्यांना धक्काबुक्की करून बाजुला सारले. मारहाण सुरू असल्यामुळे जितेंद्रला त्या चौघांच्या तावडीतून सोडविण्याची हिम्मत उपस्थित एकानेही दाखविली नाही. हा आवाज ऐकून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धावून आले. तोपर्यंत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती होताच भंडाराचे पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, अर्धा तासपर्यंत जितेंद्र घटनास्थळी विव्हळत पडून होता. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हरिचंद्र येंचेलवार यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी त्या चौघांविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर चौघांनी जितेंद्र येंचेलवार या शेतकरी पुत्राला बेदम मारहाण केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस उपस्थित होते. मारहाणीचा प्रकार घडून चौघेही पळून गेले. परंतु तेथील सुरक्षारक्षकांनी एकालाही अटकाव केला नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनाही बाहेर कुण्या व्यक्तीने मारहाण करण्याचा प्रसंग ओढवला तर हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: District farmer beat up young farmer in verandah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.