जिल्हा तापाने फणफणतोय
By admin | Published: October 11, 2015 01:54 AM2015-10-11T01:54:19+5:302015-10-11T01:54:19+5:30
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने भंडारा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय,
स्वाईन फ्लू आजाराने मृत्यूनंतर आरोग्य विभागात खळबळ
भंडारा : वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने भंडारा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखाण्यात होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरुन दिसत आहे. आॅक्टोंबरमध्ये भंडारा जिल्ह्यात हजारो तापाचे रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूसोबत डेंग्यू, मलेरिया व गॅस्ट्रोमुळे भंडारेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांची आकडेवारी महिन्याभरात वाढत राहणार असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
दोन आठवड्यापासून ऊन जिल्हावासीयांना असह्य झाले आहे. हवामानातील विलक्षण बदलाने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, उन्हामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या घटत असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला असला तरी डेंगीची दहशत कायम आहे. हिवताप विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात मागील सहा महिन्यात जिल्ह्यातून एकुण २ लक्ष ८१ हजार ५२८ जणांचे रक्त नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत २ लक्ष ६६ हजार ४१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ नमुने पॉझीटीव्ह आढळले. तसेच डेंग्यूचे चार रुग्ण पॉझीटीव्ह आढळले. हे रुग्ण लाखांदूर तालुक्यातील मोहरणा प्राथमिक आरोग्य केंद्र व साकोली तालुक्यातील सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणीकृत आहेत. मलेरियाच्या एकुण पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ‘पीव्ही मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या ४३ असून ‘पीएफ मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या २० आहे. महिनाभरापासून पावसाने पूर्ण पाठ फिरवल्याने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात काही भागात तुरळक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे सावधगिरीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)