जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, खाटांनी सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:00 AM2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, खाटा यांसह औषध साठ्याने सुसज्ज बनले आहे. ६२० ऑक्सिजन खाटा आणि १० हजार १०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट रोखायचीच, यादृष्टीने आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे.
राज्यात सर्वत्र ओमायक्राॅनचे संकट घोंगावत आहे. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात ३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी केली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ६२० खाटांचा सुसज्ज कोविड वाॅर्ड तयार आहे. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध आहे. १३ किलोलिटर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट येथे आहे. यासोबतच २६१ ऑक्सिजन सिलिंडर, ८० ड्युरा सिलिंडर रुग्णालयात सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. आणखी गरज पडल्यास यात वाढ करण्याची प्रशासनाची तयारी आहे. यासोबतच शहरातील शाळा, महाविद्यालये कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या १० हजार १०० रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा असून म्युकरमायकोसिससंदर्भात ३०० इंजेक्शन्सचा साठा करून ठेवण्यात आला आहे. मनुष्यबळही पुरेसे असल्याने कोरोनाची लाट रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. आता नागरिकांनी कोरोना होऊच नये यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
कुलर आणि गिझरची खरेदी
n दुसऱ्या लाटेत उन्हाळ्याच्या दिवसात कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. या समस्या आता दूर करण्यात आल्या असून १५ कुलरची खरेदी करण्यात आली आहे, १० गिझर लावण्यात आले आहेत. अडीच लाख लिटर पाण्याची टाकीही रुग्णालय परिसरात आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आठ ऑक्सिजन प्लांट रुग्णालय परिसरात असून वीज क्षमताही वाढविण्यात आली आहे. औषधी आणि इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध आहे. आग प्रतिबंधात्मक सर्व उपाय करण्यात आले आहेत.
-डाॅ. आर.एम. फारुखी, जिल्हा शल्य चिकित्सक