सहा जणांच्या अपघाती मृत्यूने हादरला जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:09 AM2019-06-19T01:09:00+5:302019-06-19T01:09:58+5:30
चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी जीप कोसळून झालेल्या अपघातात सहा निष्पाप जीवांचा बळी गेला. अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण साकोली तालुका हादरून गेला. सासरा व सानगडीवर तर शोककळा पसरली. भावी आयुष्यात उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवीत प्रवेशासाठी गेलेल्या चार विद्यार्थिनींवर काळाने झडप घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी जीप कोसळून झालेल्या अपघातात सहा निष्पाप जीवांचा बळी गेला. अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण साकोली तालुका हादरून गेला. सासरा व सानगडीवर तर शोककळा पसरली. भावी आयुष्यात उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवीत प्रवेशासाठी गेलेल्या चार विद्यार्थिनींवर काळाने झडप घातली. अपघाताचे वृत्त कळताच कुंभलीसह साकोली, सानगडी येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. जीपचा झालेला चुराडा पाहून अपघाताची भीषणता लक्षात येत होती. घटनास्थळावर पडून असलेले मृतदेह पाहून प्रत्येक जण हळहळताना दिसत होता.
साकोली येथून मंगळवारी दुपारी काळीपिवळी जीप प्रवासी घेऊन लाखांदूरकडे भरधाव निघाली. कुंभली जवळील धर्मापुरी येथील चुलबंद नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप थेट ४० फुट खोल नदीपात्रात कोसळली. ज्या ठिकाणी जीप कोसळली त्या ठिकाणी पाणी होते. त्यामुळे अपघाताची भीषणता वाढली आणि मृताचा आकडाही. अपघाताचे वृत्त माहित होताच सर्वप्रथम कुंभली येथील नागरिकांनी धाव घेतली. समोरील दृष्य पाहून प्रत्येकाच्या हृदयात चर्र झाले. काळीपिवळी जीपमध्ये अडकलेले प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. तोपर्यंत साकोली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमींना साकोली येथील दिलीप मासूरकर, विनायक करंजेकर, कैलाश गेडाम, उमेद गोडसे, विलास मेश्राम यांनी मदत करीत रुग्णालयापर्यंत पोहचविले. तर साकोली येथील रुग्णालयात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जखमी आल्याने डॉक्टर अपुरे पडतील म्हणून शहरातील खासगी डॉ. राजेश चंदवानी, डॉ.केशव कापगते यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली.
साकोली तालुक्याच्या इतिहासात अलिकडच्या काळातील हा सर्वात भीषण अपघात ठरला. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आणला. तसेच चुलबंद नदीवर कुंभली येथे असलेल्या पुलावर कठडे नसल्याचेही प्रकर्षाने पुढे आले. अपघातातील तीन जखमींवर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी माजी आमदार सेवक वाघाये यांनी केली असून त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
चालक उडी मारून पसार
भरधाव जीपला समोरून येणाºया वाहनाने डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले. जीप पुलाच्या खाली कोसळत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने सर्व प्रवाशांना वाºयावर सोडून क्षणात उडी मारली आणि जीप ४० फुट खोल नदीपात्रात कोसळली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. जीपचालकाचे नाव मात्र कळू शकले नाही.
गुणगुण जात होती मामाच्या गावी
गोंदिया येथील गुनगुन हितेश पालांदुरकर ही १५ वर्षीय बालिका या अपघातात ठार झाली. ती आपली आई विणा आणि लहान बहिण सिद्धी हिच्यासोबत मामाच्या गावी जात होती. मात्र या अपघातात तिला काळाने हिरावून नेले तर आई आणि बहिण गंभीर जखमी झाले.
अन् मुलीचा मृतदेहच दिसला
कुंभली जवळ अपघात झाल्याचे माहित होताच सानगडी येथील देवाजी कुंभरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या गावातील कोण जखमी झाले, कोण मृत्यूमुखी पडले हे पाहत असताना त्यांना समोर सुरेखा या आपल्या मुलीचाच मृतदेह दिसला. मुलीचा मृतदेह पाहताच त्यांनी फोडलेला टाहो आसमंत भेदून गेला. सानगडी आणि सासरा येथील शेकडो नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
संतप्त नातेवाईकांचे आंदोलन
च्या अपघाताला अवैध प्रवासी वाहतुकच जबाबदार असून संपूर्ण तालुक्यातून अवैध प्रवासी वाहतूक बंद करा तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबियाला दहा लाखांची मदत करा अशी मागणी करीत सानगडी व सासरा येथील नागरिकांनी रुग्णालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेच्या सभापती रेखा वासनिक, चुन्नीलाल वासनिक, अविनाश ब्राम्हणकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित आहेत. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे आणि तहसीलदार तेढे नागरिकांची समजूत काढीत होते. परंतु वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरुच होते.