जिल्हा रुग्णालय अग्निशमन यंत्रणेविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:49+5:30
जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहेत. अनेकदा रुग्णही त्या खिडकींमधून सांडपाणी, वाचलेले अन्न व अन्य केरकचरा बाहेर फेकतात.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी संजीवणी ठरणारे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जीवघेणे ठरू पाहत आहे. ४५० खाटांच्या रुग्णालयात आधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत नाही. वेळप्रसंगी रुग्णालयाच्या इमारतीत आग लागल्यास लहान सिलिंडर्स (फायरसेफ्टी हायड्रंट) व पालिकेच्या अग्निशमन बंबावर अवलंबून रहावे लागेल, यात शंका नाही.
१४ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात भंडारा मुख्यालयी जिल्हा रुग्णालयाची भव्य वास्तू आहे. विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या रुग्णालय परिसरात कोट्यवधी रूपये खर्चून भव्य इमारती उभारण्यात आल्या आहेत.
जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहेत. अनेकदा रुग्णही त्या खिडकींमधून सांडपाणी, वाचलेले अन्न व अन्य केरकचरा बाहेर फेकतात.
वॉर्डावॉर्डात खाटांची सुविधा असली तरी रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांना खाली झोपावे लागते. त्यातच आगीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठिकठिकाणी फायरसेफ्टी सिलिंडर लावण्यात आले आहे. मात्र आधुनिक पद्धतीने आगीवर मात करण्यासाठी असलेली उपकरणे जुन्या इमारतीत उपलब्ध नाहीत. फायरसेफ्टी स्प्रिंकलर सिस्टम, स्मोकन, अलार्म यंत्रणा, फायर एक्टिंग्युशर ही यंत्रणाही रुग्णालयात उपलब्ध नाही. याशिवाय फायर एस्केप व लॅडरही उपलब्ध नाही. नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये सदर यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या स्पष्ट सूचना असून त्यानुसार कार्यही होत आहे. परंतु जुन्या इमारतीत ही सुविधा उपलब्ध नाही.
परिणामी भविष्यात वॉर्ड असलेल्या इमारतीत आग लागल्यास रुग्णांच्या जीवाला मोठा धोका आहे. हातात मावनारे सिलिंडरर्स आगीवर कितपत आळा घालतील, ही विचारात घालणारी बाब आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांना उपरोक्त सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध करणे बंधनकारक केले असताना जिल्हा रुग्णालयातच दिव्याखाली अंधार आहे.
रुग्णालयात फायरसेफ्टीसाठी सिलिंडर्स उपलब्ध आहेत. स्प्रिंकलर सिस्टम व स्मोकन अलार्म यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
-प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा