प्रेमासाठी तोडले जिल्हाबंदीचे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:17+5:302021-05-20T04:38:17+5:30
लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता गत गुरुवारी रात्री ११ वाजता घरून निघून गेली. ...
लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता गत गुरुवारी रात्री ११ वाजता घरून निघून गेली. तिला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आजोबांनी लाखनी ठाण्यात शुक्रवारी दाखल केली. लगेच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. परंतु मुलीचा शोध लागता लागेना. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने शोध लावला. घटनेच्या काही दिवस आधी त्याने मित्राकडून मोबाइल क्रमांक घेतला होता. त्यावर मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून वार्तालाप करू लागला. त्यानंतर तो दुसऱ्या मोबाइलवरून मुलीशी चॅटिंग करू लागला. गुरुवारी रात्री घरचे झोपी गेल्याचे पाहून घरून निघून गेली. कन्हाळगाव येथे पोहोचून प्रियकरास फोन केला. तो रात्री ११.३० -१२ च्या दरम्यान कन्हाळगाव येथे आला आणि त्या मुलीला दुचाकीवर बसवून तळोधी (जि. चंद्रपूर) येथे घेऊन गेला. सुरुवातीचे चॅटिंगच्या आधारावर तो व्यक्ती तळोधी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तळोधी गाठले. त्या व्यक्तीला गाठून विचारपूस केली असता त्याने तो मी नव्हे अशी भूमिका बजावली. परंतु मी वापरत असलेला क्रमांक त्याच्या मित्राने नेले होते असे त्याने सांगितल्याने त्या मित्रापर्यंत पोलीस पोहोचले. त्यांना लाखनी येथे आणले. सध्या परिसरात लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. मुलीच्या गावाला येण्यासाठी जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याची हद्द आहे. दोन जिल्ह्याच्या सीमा आहेत. आपल्या प्रेयसीसाठी त्याने केलेल्या धाडसाचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे यांच्या मार्गदर्शनात परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके, पोलीस हवालदार शालू भालेराव, पोलीस शिपाई हरिश देवकते, चालक जतीन दासानी यांच्यासह सायबर सेलने केली.