जिल्ह्यात खरिपाची केवळ ०.१२ टक्के पेरणी

By Admin | Published: June 25, 2016 12:20 AM2016-06-25T00:20:29+5:302016-06-25T00:20:29+5:30

रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडा गेला. पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नाही.

In the district only 0.12% sowing of Kharif | जिल्ह्यात खरिपाची केवळ ०.१२ टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची केवळ ०.१२ टक्के पेरणी

googlenewsNext

देवानंद नंदेश्वर भंडारा
रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडा गेला. पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्र्रा नक्षत्रातही ढग जमा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने भात नर्सरी (पऱ्हे) टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.
आर्द्रा नक्षत्र सुरू असून आतातरी चांगला पाऊस पडेल व बियाणांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी २ लाख ९ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र निर्धारीत केले असून केवळ ०. १२ हेक्टरमध्ये खरिपाची लागवड झाली. भात पिकासाठी १ लाख ८२ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारीत केले असून केवळ ६३५ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नर्सरी लावणे बंद केले आहे. ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता बळावली आहे. ओलिताची सोय असणाऱ्या शेतकरी काहीशी हिंमत बांधून आहे.
जिल्ह्यात ६३५ हेक्टरमध्ये भात नर्सरी, ५९ हेक्टरमध्ये आवत्याची लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्र्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे.
मागीलवर्षीसुद्धा पावसाने साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची वेळ आली होती. यंदा आणखीच बिकट स्थिती दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वी अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीला सुरूवात केली. त्यानंतर पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी नर्सरी उगवलीच नाही. शेतात भात नर्सरीसाठी टाकलेले दाने पक्षी टीपत आहेत. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते नर्सरीसाठी बियाणे पेरणी करीत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी पेरणी थांबविलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७.३ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र भात नर्सरीसाठी १५६.५ मिमी पावसाची गरज असते.

दुबार पेरणीचे संकट
केवळ एकदाच रिमझिम आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे (भात नर्सरी) सुकू लागल्या आहेत. ज्यांनी नर्सरीसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा राहण्यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे रोपवाटिका नष्ट करीत आहेत. यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.
पावसाची हुलकावणी
जिल्ह्यात यंदा चक्रीवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे भात नर्सरीचे क्षेत्र अत्यल्प आहे. भंडारा व तुमसर तालुका वगळता मोहाडी तालुक्यात ५० हेक्टरमध्ये, पवनी ५०, साकोली २१०, लाखांदूर २०८, लाखनी तालुक्यात ११७ हेक्टरमध्ये अशी एकूण ६३५ हेक्टरमध्ये भात नर्सरी तयार करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात ४५ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यामध्ये १४ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची १५२ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. निसर्गाच्या अवकृपेमुळे चार वर्षांपासून शेतकरी संकटांचा सामना करीत आहे.

Web Title: In the district only 0.12% sowing of Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.