श्रीराम जन्मोत्सवासाठी जिल्हा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 05:00 AM2022-04-10T05:00:00+5:302022-04-10T05:00:44+5:30
भंडारा शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथे रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खामतलाव परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून यात चित्ररथ, देखावे आदी सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : श्रीराम जन्मोत्सवासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला असून ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई आणि चौकाचौकांमध्ये भगव्या पताका लावल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून रविवार १० एप्रिल रोजी भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
भंडारा शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथे रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खामतलाव परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून यात चित्ररथ, देखावे आदी सहभागी होणार आहेत. मोठा बाजार परिसरातील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून रविवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शोभायात्रेदरम्यान नागरिकांसाठी पाणी, शरबत आणि महाप्रसादाचे स्टॉल लावून सहकार्याचे आवाहन केले आहे.
तुमसरमध्ये तरुणांचा पुढाकार
तुमसर शहरातील तरुणांनी धूमधडाक्यात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.
रविवारी आयोजित शोभायात्रेत नागपूर, रायपूर येथील चित्ररथांसह बॅन्ड पथक सहभागी होणार आहे. यावर्षी मराठा सेवा संघ, संताजी युवा मंडळ, पोवार समाज, ब्राह्मण समाज, ज्ञानेश्वरी मंडळ, नवदुर्गा उत्सव सेवा मंडळ यांचे चित्ररथ राहणार आहे.
साकोलीत सर्वपक्षीय आयोजन
- साकोली येथे रविवार १० एप्रिल रोजी सर्वपक्षीय श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता सेंदूरवाफा येथील गजानन महाराज मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून श्रीराम भक्त हनुमान मंदिर तलाव येथे समारोप होणार आहे. विविध देवस्थानचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटना जन्मोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.