पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला मिळाले ६९ व्हेंटिलेटर्स; यातील ४ तांत्रिक कारणांमुळे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:35 AM2021-05-14T04:35:01+5:302021-05-14T04:35:01+5:30
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. गावागावांत रुग्ण आढळून येत होते. यातील अतिगंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य ...
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. गावागावांत रुग्ण आढळून येत होते. यातील अतिगंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत होते. परंतु तेथे बेडचा अभाव आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत होती. अपुऱ्या व्हेंटिलेटरमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत होता. मात्र यातून मार्ग काढीत आरोग्य यंत्रणेने अनेकांचे प्राण वाचविले. जिल्हा सामान्य रुग्णालयाला गतवर्षी पीएम केअर फंडातून ६९ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयात फारशी सुविधा नसल्याने रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयातून कोविड केअर सेंटरमध्ये येतात. हा अनुभव असल्याने सर्व ६९ व्हेंटिलेटर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये लावण्यात आले. मात्र त्यातील चार व्हेंटिलेटर सुरूच झाले नाहीत. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने संबंधित एजंसीशी संपर्क साधला. नागपूर येथून तंत्रज्ञ आले. परंतु त्यात मोठा तांत्रिक बिघाड असल्याने त्यात दुरुस्ती होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे चारही व्हेंटिलेटर सद्यस्थितीत अडगळीत पडून आहेत. मात्र आता व्हेंटिलेटर निर्माता कंपनी हे चारही व्हेंटिलेटर बदलून देणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विशेष म्हणजे हे चार व्हेंटिलेटर वेळीच दुरुस्त झाले असते तर त्याचा उपयोग अनेक रुग्णांसाठी करता आला असता. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या कमी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाला व्हेंटिलेटरची फारशी गरज पडत नसल्याचे दिसून आले.
चार व्हेंटिलेटर अडगळीत पडून
जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळालेले चार व्हेंटिलेटर सुरुवातीपासूनच नादुरुस्त असल्याचे दिसून आले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने संबंधित कंपनीसोबत पत्रव्यवहार केला. त्यावरून नागपूर येथून तंत्रज्ञांचा चमू रुग्णालयात दाखल झाला. व्हेंटिलेटरची तपासणी केली. मात्र त्यात मोठा बिघाड असून ते दुरुस्तीच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून हे चारही व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयात अडगळीत पडून आहेत. गतमहिन्यात मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज होती. त्यावेळी चार व्हेंटिलेटर बदलून मिळाले असते तर मोठी मदत झाली असती. पीएम केअर फंडासह इतर व्हेंटिलेटरही सुस्थितीत असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीत आढळून आले. रुग्णसंख्या कमी असल्याने व्हेंटिलेटरची फारशी गरजही दिसत नव्हती.
कंपनी बदलून देणार व्हेंटिलेटर
नादुरुस्त झालेले व्हेंटिलेटर दुरुस्त होऊ शकत नाहीत असे तंत्रज्ञांनी सांगितले. त्यावरून रुग्णालय प्रशासनाने संबंधित कंपनीसोबत पत्रव्यवहार केला. आता लवकरच हे चारही व्हेंटिलेटर बदलून देणार असल्याची माहिती आहे. एकंदरीत पीएम केअरमधून मिळालेले ६५ व्हेंटिलेटर सध्या कार्यान्वित असून गत महिन्यात ते रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला पीएम केअरमधून मिळालेले ६५ व्हेंटिलेटर सध्या कार्यान्वित आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने व्हेंटिलेटरची कोणतीही अडचण नाही. नादुरुस्त असलेल्या चार व्हेंटिलेटरबाबत तंत्रज्ञांनी पाहणी केली आहे. ते लवकरच दुरुस्त होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होतील. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची योग्य काळजी घेत आवश्यक त्यांना व्हेंटिलेटर लावले जात आहेत.
- डाॅ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक