मराठी बोलीच्या संवर्धनासाठी जिल्हा साहित्य संमेलन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:55 AM2019-01-25T00:55:49+5:302019-01-25T00:56:53+5:30
मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, सार्वजनिक वाचनालय व भंडारा व युगसंवाद वाड:मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडाराच्या संयुक्त विद्यमाने इंद्रराज सभागृह येथे डॉ. अनिल नितनवरे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, विदर्भ साहित्य संघाचे शाखा समन्वयक प्रदीप दप्ते, कलाकार वसंत वाहोकर, विसासंघाचे कोषाध्यक्ष प्रदीप मुन्शी, प्रदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, आजची मराठीतील मोठमोठी संमेलने कुणाच्या आश्रयाने चालतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग अशा आश्रयदात्यांच्या दबावाखाली सारं कराव लागते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे स्वत:चा निधी असता तर यवतमाळचे साहित्य संमेलन आम्हाला सहजासहजी यशस्वी करता आले असते. अशा साहित्य संमेलनासाठी निधी असावा. तो मराठी प्राध्यापकांनी व मराठी मानसांनी उभारावा, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. धनंजय दलाल यांनी विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन भंडारा येथे घेण्याची घोषणा केली. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव यांनी आभार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी मानले.