जिल्हा क्रीडा संकुल उठले खेळाडूंच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:04 PM2018-09-25T22:04:20+5:302018-09-25T22:04:41+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधांचा अभाव आहे. येथील गटाराच्या टाक्याचे झाकण उघडे असून हायमास्ट लाईटही बंद आहे. मुख्य मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधांचा अभाव आहे. येथील गटाराच्या टाक्याचे झाकण उघडे असून हायमास्ट लाईटही बंद आहे. मुख्य मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. अशा परिस्थितीत अपघात होण्याची कायम भिती आहे. सोमवारी सायंकाळी स्केटींगचा सराव करतांना एका खेळाडूच्या अंगावर संरक्षण कठडा कोसळल्याने तो जखमी झाला. येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यावर असल्याने कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. त्याचा मनस्ताप खेळाडूंना होत आहे.
येथील बसस्थानक परिसरात जिल्हा क्रीडा संकुल ‘शिवाजी स्टेडीयम’ आहे. याठिकाणी शहरातील शेकडो विद्यार्थी खेळाचा सरावासाठी जातात. सकाळपासून रात्रीपर्यंत याठिकाणी खेळाडूंची गर्दी असते. पंरतु तेथे या खेळाडूंसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाही. येथील मुख्य मैदानावरच मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवताकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. बॅटमिंटन इनडोअर स्टेडीयमकडे जाणाºया मार्गावर गटाराचे झाकण उघडे आहे. उघडे गटार अपघाताला आमंत्रण देत आहेत. स्केटींग ग्राऊंडवर संरक्षणासाठी लोखंडी जाळीचे मोठे कठडे लावण्यात आले आहे. यातील अनेक कठड्यांचा खालील बाजूंचा मुख्य आधार तुटलेला आहे. त्यामुळे संरक्षण कठडे अनेकदा कोसळतात. अनेक कठड्यांना तर चक्क तारांनी तात्पुरत्या स्वरुपात बांधले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात प्रकाश व्यवस्थेसाठी हायमास्क लाईट लावण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही लाईट बंद आहेत. त्यामुळे सायंकाळ नंतर मैदानावर अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे सरावासाठी येणारे खेळाडू आणि व्यायामासाठी येणारे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी सरावासाठी येतात. पंरतु लाईट व्यवस्थेअभावी एखाद्यादिवशी अप्रिय घटना होण्याची भीती आहे.
येथील जिल्हा क्रीडा अधिकारी प्रभारी आहे. त्यामुळे येथे कोणत्याही सुविधा तात्काळ उपलब्ध होत नाही. येथील जलतरण तलाव तर गत काही महिन्यांपासून कायमचे बंद आहे. अशा एकना अनेक सुविधांचा अभाव येथे आहे. खेळाडू याबाबद वारंवार तक्रारी करतात पंरतु त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. खेळाडंूचे भविष्य उज्वल करणाºया या क्रीडा संकुलाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी खेळाडूंना येथे योग्य वातावरण मिळण्यास अडचणी जात आहेत.
स्केटींग करतांना अंगावर कोसळले सुरक्षा कठडे
जिल्हा क्रीडा संकुलातील स्केटींग ग्राऊंडवरील नादुरुस्त लोखंडी ग्रील अंगावर पडल्याने पाच वर्षीय स्पर्श उदय दमाहे हा खेळाडू जखमी झाला. स्पर्श सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता स्केटींगची प्रॅक्टीस करीत होता. त्यावेळी त्याच्या अंगावर लोखंडी जाळीदार कठडे कोसळल्याने त्याच्या हाताची चार बोटे मोडल्या गेली. त्याला पालकानी तात्काळ दवाखान्यात नेले. त्याच्या हाताला आता प्लॉस्टर बांधले आहे. याबाबत पालक उदय दमाहे यांनी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना पत्र दिले असून यापत्रातही त्यांनी येथील व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहे.
स्पर्श दमाहे हा स्केटींगची प्रॅक्टीस करतांना जखमी झाला. त्याला आम्ही रुग्णालयात नेले. सर्व बाबींची चौकशी करुन येथे सर्व सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुरु आहे.
- प्रशांत दोंदल
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी