‘आयुष्यमान’साठी जिल्ह्यात १ लाख ३४ हजार कुटुंब पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:42 PM2019-01-30T22:42:51+5:302019-01-30T22:43:08+5:30
आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील कुटुंबांना प्रती वर्ष पाच लाखापर्यंत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील कुटुंबांना प्रती वर्ष पाच लाखापर्यंत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने आयुष्यमान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २१ मार्च २०१८ पासून सुरु केली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. भंडारा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ४४८ कुटूंब या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु असून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही लवकरच ही योजना सुरु होणार आहे. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी आरोग्य विमा योजनेसाठी निकषानुसार लाभ दिला जाणार आहे. त्यात लाभार्थी सामाजिक, आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण २०११ च्या यादीमधील कुटुंबातील असावा, कुटुंबातील सदस्यसंख्या वय, लिंग याचे कोणतेही बंधन नाही. देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय किंवा खासगी रुग्णालयातील या सेवेचा लाभ मिळणार आहे. रुग्णालयामध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया १३९३ आजारावर उपचार व शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे ई-कार्ड असणे मात्र आवश्यक आहे.
भंडारा जिल्ह्यात सदर योजनेचे ई-कार्ड नि:शुल्क तयार करून देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र ई-कार्ड तयार करावे लागेल. त्यासाठी लाभार्थ्याला मुळ शिधापत्रिका, मुळ आधारकार्ड, मोबाईल नंबर घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय, रंगारी नर्सिंग होम, नाकाडे नर्सिंग होम, पेस हॉस्पीटल, सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर यापैकी एका ठिकाणी जाऊन आपले कार्ड बनवून घ्यावे लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड बनविण्याचे व रुग्णांना लाभ देण्याचे कार्य सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-कार्ड तयार करून घ्यावे.
-शांतनू गोयल, जिल्हाधिकारी,