जिल्हा दोषसिद्धतेत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:18 PM2019-01-09T22:18:06+5:302019-01-09T22:18:29+5:30
एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भंडारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुन्हे दोषसिद्धतेत जिल्हा अव्वल आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात न्यायालयात दाखल ४ हजार ११८ प्रकरणापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. दोषसिद्धतेचे प्रमाण २३.३५ टक्के आहे.
जिल्ह्यात विविध गुन्ह्यांचा तपास करून पोलीस प्रकरण न्यायप्रविष्ट करतात. मात्र अनेक प्रकरणात विविध कारणाने आरोपी दोषमुक्त होतात. गत चार वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५ साली दोषसिद्धतेचे प्रमाण १७.७७ टक्के होते. तर २०१६ मध्ये १८.९१ टक्के, २०१७ मध्ये १७.२३ टक्के आहे. मात्र गतवर्षी २०१८ साली यात ६.१२ टक्क्याने वाढ होऊन २३.३५ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण आहे.
भंडारा जिल्ह्यात २०१८ मध्ये चार हजार १११ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
२०१७ मध्ये चार हजार ५० प्रकरणांपैकी ९९८ म्हणजे १७.२३, २०१६ मध्ये तीन हजार १९९ प्रकरणांपैकी ६०५ म्हणजे १८.९१ आणि २०१५ मध्ये तीन हजार ७७७ प्रकरणांपैकी ६७० म्हणजेच १७.७४ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण दिसून आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळेस पासून त्यांनी दोषसिद्धतेबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेला कामी लावले. प्रकरणाचा तपास योग्यरित्या करून आरोपींना शिक्षा कशी होईल यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्या अंतर्गत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. सत्र न्यायालयात २०१८ मध्ये दाखल १३० प्रकरणांपैकी ४४ प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली तर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल ३६१ प्रकरणांपैकी ४४१ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेचे प्रमाण ३९.६ टक्के आहे. शिक्षेचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये याची भीती निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात दोषसिद्धततेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. २०१५ पासून यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्याचे दोषसिद्धतेचे प्रमाण ३५ टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.
-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.