कोविड लसीकरणासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाभर जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:06+5:302021-06-20T04:24:06+5:30
भंडारा ५३, मोहाडी २६ , साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर ३४ व तुमसर १९ अशा एकूण ...
भंडारा ५३, मोहाडी २६ , साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर ३४ व तुमसर १९ अशा एकूण २४४ गावांमध्ये दोन दिवस विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सोमवारी १३० गावात तर मंगळवारी ११४ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठीची ही विशेष मोहीम आहे. सोमवारी व मंगळवारी काही लसीकरण केंद्रांना जिल्हाधिकारी स्वतः भेटी देणार आहेत.
कोरोनावर लस हाच एकमेव इलाज असून नागरिकांनी लस घ्यावी यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी लसीकरण कमी असलेल्या गावांत घरोघरी भेटी देऊन लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
'एकच मिशन, लसीकरण' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून प्रशासन मैदानात उतरले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याप्रती जागृत होऊन जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम मैलाचा दगड ठरणारी आहे. आरोग्य विभागाने या मोहिमेची संपूर्ण तयारी केली असून, पात्र सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध आहे. नागरिकांनी नियोजित वेळेत लसीकरण केंद्रात येऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोट
कोरोनापासून बचावासाठी लस हीच आरोग्याची कवच कुंडले आहेत. लस ही अत्यंत सुरक्षित आहे. लसीबाबतचा संभ्रम व शंका मनातून काढून टाका. कुठलाही गैरसमज मनात ठेऊ नका. अफवांवर अजिबात विश्वास करू नका. ही लसीकरण मोहीम आपल्यासाठी असून, पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस आवश्य घ्यावी
संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा