जिल्ह्याला एक हजार रेमडेसिविर मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:32+5:302021-04-17T04:35:32+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लसीकरण, लस उपलब्धता, रेमडेसिविर, ऑक्सिजन उपलब्धता व ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लसीकरण, लस उपलब्धता, रेमडेसिविर, ऑक्सिजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भंडारा सामान्य रुग्णालयात प्राणवायूनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय तुमसर, साकोली व पवनी या ठिकाणी प्राणवायूनिर्मिती प्रकल्प उभारण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. भंडारा येथे जास्त क्षमतेचा प्रकल्प असावा, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयाची बेड क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा तसेच ज्या रुग्णालयामध्ये स्टाफची कमतरता आहे, त्या ठिकाणी खासगी रुग्णालय व डॉक्टरची मदत घेण्यात यावी. खासगी रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष देण्यात यावे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी जनरेशन प्लान्ट तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. डॉक्टर व नर्सेसची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्याला २ लाख ३५० डोस प्राप्त झाले असून, १ लक्ष ६८ हजार ५०४ लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. लसीकरणात भंडारा जिल्हा पहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.