जिल्ह्यात २० हजार क्विंटल बियाण्यांची टंचाई जाणवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:09 AM2019-06-07T01:09:04+5:302019-06-07T01:09:27+5:30
खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामुळे २० हजार ८२० बियाणांचा अद्यापही तुटवडा निर्माण झाला आहे.
भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पºहे करपून तर काहींची रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली. भंडारा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतांनाही प्रशासनाने दुष्काळातून बाद केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. गतवर्षीची भर रब्बी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा प्रयत्न वातावरण बदलामुळे फसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. यात खरीप भात एक लाख ८० हजार हेक्टर, तुर १२ हजार १०० हेक्टर व सोयाबीन ५५० हेक्टर आहे. यावर्षी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. यात भात पिकासाठी ४३ हजार ७३९ क्विंटल, तूर ८६५ क्विंटल व सोयाबीन ३५० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. मात्र आजपर्यंत तूर ३४०, सोयाबीन १५०, तर भात २३ हजार ७६१, असे एकूण २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यावर्षी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी अधिकाºयांचे म्हणणे आहे.
तसेच रासायनीक खतांसाठी ८६ हजार १०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यात युरिया ३८ हजार ७४० मे. टन, डीएपी १० हजार ६३० मे. टन, एसएसपी ११ हजार ३१०, एमओपी २ हजार ९८० व इतर संयुक्त खते २३ हजार ४४० मेट्रीक टनचा समावेश आहे. यापैकी आजपर्यंत ३७ हजार ७३४ मेट्रीक टन रासायनीक खतांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९८ हजार २६० सभासदांना ४१४ कोटी ५० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. मात्र अद्यापही बहुतांश शेतकरी कर्जापासून वंचित असल्याचे दिसून येते. याला कारणीभूत बँकेचे अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश देत असले तरी दुसरीकडे मात्र बँकेचे अधिकारी कर्ज वाटपात टाळाटाळ करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गतवर्षी ६९ हजार ४२४ शेतकºयांना ३२४ कोटी ७६ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, हे विशेष.
शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध
नवतपा ५ जून रोजी संपला आहे. मात्र अद्यापही उन्हाच्या झळा कायम आहे. शेतकरी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. धुरे पेटविणे, काडीकचरा गोळा करणे, शेतात असलेली तणस सुरक्षीत ठेवणे, शेतात शेणखत घालण्याचे काम वेगात सुरु आहे. अनेकांची ही कामे आटोपली असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.
भरारी पथक सक्रिय
खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशकांतून शेतकऱ्यांची फसगत होवू नये, यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथक तयार केले असून कृषी केंद्राची कसून तपासणी करीत आहे. दोषी केंद्र संचालकांविरुध्द कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तक्रार निवारणासाठी दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.