दिव्यांगांना मिळाले उंच भरारीचे बळ
By admin | Published: June 17, 2017 12:25 AM2017-06-17T00:25:13+5:302017-06-17T00:25:13+5:30
अंध, अपंग, कर्णबधीर, वाचादोष, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गातील विद्यार्थी असो वा नागरिकांकडून त्यांना बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच दुर्लक्षितपणाचा असतो.
ग्रीष्मकालीन शिबिर : ५७ विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंध, अपंग, कर्णबधीर, वाचादोष, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गातील विद्यार्थी असो वा नागरिकांकडून त्यांना बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच दुर्लक्षितपणाचा असतो. अशा दिव्यांगांना त्यांच्यातील कौशल्य विकसित करता यावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांचे ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद व उंच भरारी घेण्याचे बळ मिळाले आहे.
लाल बहादूर शास्त्री विद्यालयात या शिबिराचे आयोजन सर्व शिक्षा अभियान दिव्यांग समावेशीत शिक्षण, गटसाधन केंद्र, पंचायत समिती भंडाराच्या वतीने करण्यात आले. या शिबिरात सुमारे ५७ दिव्यांगांनी सहभाग घेतला आहे. यात जि.प., न.प. अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत या विद्यार्थ्यांना योगा, म्युझिकल योगा, संगित, वादन, नृत्य, आर्ट अॅन्ड क्रॉफ्ट, स्पीच थेरपी, फिजिओ थरेपी, क्रीडा स्पोर्ट, वैयक्तिक कौशल्य, सामाजिक कौशल्य, व्यावसायीक कौशल्य, संगणक प्रशिक्षण, पालक समुपदेशन याचे धडे देण्यात आले.
समाजाने दुर्लक्षित केलेल्या दिव्यांगांना या शिबिरात मिळालेल्या प्रेमामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. या शिबिरासाठी चंद्रप्रभा वडे, विना मलेवार, संगिता देशमुख, शिल्पा वलके या विशेष शिक्षकांसह विषयतज्ज्ञ गोळघाटे, सुधीर भोपे, ज्योत्सना बांबोर्डे, संघमित्रा रामटेके यांनी समाजाला जागवू या, दिव्यांगांना सक्षम बनवून या, याचे तंतोतंत पालन करून दिव्यांगांना साथ दिली.