नोकरीकरिता दिव्यांग शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:52 AM2018-08-03T00:52:45+5:302018-08-03T00:53:28+5:30
तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल मॉईल प्रशासनाने घेतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल मॉईल प्रशासनाने घेतली नाही.
आमरण उपोषणाला बसलेल्या दिव्यांगाचे नाव विजय बिसराज बर्वे असे आहे. मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारचा उपक्रम ही खाण संचालित करीत आहे. खुली खाण परिसरात बिसराज बर्वे यांची शेती मॉईल प्रशासनाने संपादीत केली. त्या शेतीचा मोबदला मॉईल प्रशासनाने दिला. मात्र त्यांच्या कुटूंबातील सदस्याला नोकरी दिली नाही. नंतर नोकरी देऊ असे सांगण्यात आले, परंतु अजुनपर्यंत नोकरी दिली नाही. त्याविरोधात विजय विसनराज बर्वे व त्यांचे कुटूंबीय २८ जुलैपासून मॉईल प्रवेशव्दारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे, पंरतु मॉईल प्रशासनाने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. तहसलीदार गजेंद्र बालपांडे यांनी गुरुवारी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते विजय बर्वे, त्यांचे कुटूंबीय व मॉईलचे अभिकर्ता राजेश भट्टाचार्य यांचेशी चर्चा केली. सकारात्मक तोडगा काढण्याचे मॉईल प्रशासनाला सांगितले. बर्वे कुटूंबीयांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. २० वर्षेपर्यंत मॉईलने नोकरी का दिली नाही, हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
मॉईलन बर्वे कुटूंबियांची जमीन संपादीत केली असून त्या गटावर नोकरी दिली आहे. आमचेकडे सर्व कागदपत्रे नियमानुसार आहेत. नियमानुसारच मॉईलची कामे केली जातात.
-राजेश भटचार्य, अभिकर्ता, मॉईल प्रशासन, डोंगरी
‘गुरुवारी उपोषण स्थळाला भेट देवून बर्वे कुटंूबियाशी चर्चा केली. याबाबत मॉईल अभिकर्त्यांशी संवाद साधून तोडगा काढण्यास सांगितले.
-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, तुमसर