दिव्यांग विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:58 PM2018-08-03T21:58:26+5:302018-08-03T21:59:15+5:30
अपघातानंतर दिव्यांग झालेल्या आयटीआय विद्यार्थ्याला प्रात्याक्षिक परिक्षेपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शासकीय आयटीआय तुमसर येथे उघडकीस आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचे नाव चंद्रशेखर पृथ्वीराज बरयेकर (२२) रा. सिहोरा असे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अपघातानंतर दिव्यांग झालेल्या आयटीआय विद्यार्थ्याला प्रात्याक्षिक परिक्षेपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शासकीय आयटीआय तुमसर येथे उघडकीस आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचे नाव चंद्रशेखर पृथ्वीराज बरयेकर (२२) रा. सिहोरा असे आहे.
चंद्रशेखर बरयेकर हा स्व. सेवकराम पारधी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरदोली येथील जोडारी (फिटर) ट्रडचा विद्यार्थी आहे. जोडारीच्या सर्व सेमीस्टर परिक्षा त्याने उत्तीर्ण केल्या आहेत. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने एका कारखान्यात काम करीत होता. दरम्यान कारखान्यात त्याचा अपघात झाला. अपघातात त्याचा डावा हात निकामी झाला. याप्रकरणी चंद्रशेखरकडे सर्व कागदपत्रे असून हात निकामी झाल्याचा तो स्वत: प्रत्यक्ष पुरावा आहे.
१ आॅगस्ट रोजी चंद्रशेखर तुमसर येथील शासकीय आयटीआय केंद्रावर जोडारी ट्रेडची प्रात्याक्षिक परिक्षा देण्याकरिता गेल्यावर प्राचार्यांनी त्याला प्रात्याक्षिक परिक्षा स्वत: द्यावी. मदतनीसाची मदत मिळणार नाही, असे सांगितले. चंद्रशेखरचा हात निकामी झाल्याने तो प्रात्याक्षिक परिक्षा देण्यास असमर्थ ठरला. आयटीआयच्या प्राचार्यांनी सुध्दा शासकीय आयटीआयच्या प्राचार्यांना विनंती केली. पंरतु नियमांचा आधार देत दिव्यांग विद्यार्थ्याला मदतनीस देता येत नाही असे सांगितले उत्तर विद्यार्थ्यांने स्वत: प्रात्याक्षिक करावे असे सांगितले.
दिव्यांग चंद्रशेखर याने काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे, प्रा. कमलाकर निखाडे यांना भेटून सर्व माहिती सांगितली. दि. २ आॅगस्ट रोजी प्राचार्य आर. एस. राऊत यांचेशी भेटून डॉ. कारेमोरे व प्रा. निखाडे यांनी चर्चा केली. नागपूर येथील उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. परंतु तोडगा निघाला नाही. मुंबई येथील संचालकांच्या निर्देशानुसारच कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
जोडारी ट्रेड प्रात्याक्षिक परिक्षा कौशल्यात मोडते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत: जॉब तयार करावा लागतो. मदतनीसाचा प्रकार प्रात्याक्षिक परिक्षेत चालत नाही. लेखी परिक्षेत मदतनीस देण्याचा नियम आहे. चंद्रशेखरच्या प्रकरणात नागपूर कार्यालयाकडे सदर समस्येचा मेल केला आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसारच कारवाई करण्यात येईल.
- आर. एस. राऊत, प्राचार्य - शासकीय आयटीआय तुमसर
अपघातात हात निकाली झाला. विशेषबाब म्हणून दिव्यांग चंद्रशेखरला प्रात्याक्षिक परिक्षात मदतनीस मिळावयास पाहिजे. अर्ध्यावर कुणी पदवी सोडून जाईल काय? माणसाकरिता कायदा आहे. कायद्याकरिता माणूस नाही. प्रात्याक्षिक परिक्षेपासून वंचित ठेवल्यास आंदोलन करण्यात येईल.
- डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते तुमसर