दिव्यांग महिला रोहयो हजेरी पटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:01:07+5:30
सदर कामावर ही महिला गेली नाही. तरी तिला २१ जानेवारी २०१९ ते २७ जानेवारी २०१९ व २८ जानेवारी २०१९ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पाच - पाच दिवस असे दहा दिवस कामावर उपस्थिती दाखविली गेलीे. दहा दिवसाची १३४० रुपये मजुरी काढण्यात आली. तथापि, ही महिला २३ मार्च २०१८ पासून आजारी आहे. तिला धड चालताही येत नसतानाही त्या महिलेला रोजगार हमी योजनेच्या कामावर दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील कान्हळगाव येथील एक महिला दोन वषार्पासून आजाराने ग्रासली आहे. तिला धड चालताही येत नाही. अशा स्थितीत महिलेचा रोजगार हमी योजनेच्या हजेरी पत्रकात रोजगार सेवकाने नाव घातले. एवढेच नाही तर तिला फक्त दोनशे रुपये देवून तिची बोळवण केली. कान्हळगाव येथील चीड आणणारे प्रकरण नुकतेच पंचायत समितीमध्ये उघडकीस आले.
कान्हळगाव येथील रोजगार सेवकाची तक्रार मोहाडी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची चौकशी करुन बयान घेण्यासाठी पाच जणांना मोहाडी पंचायत समितीत बोलावण्यात आले. त्यापैकी दिव्यांग ४५ वर्षीय महिला चार चाकी वाहनाने पंचायत समितीमध्ये बयानासाठी आणण्यात आले होते.
ती महिला चालूही शकत नाही म्हणून तिच्या बयान पत्रावर अंगठा लावण्यासाठी महिला शिपाई पाठविण्यात आली होती. तेंव्हा या महिलेच्या बयानात रोजगार सेवकाने केलेला प्रकार उघडकीस आला. कान्हळगाव येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले.
सदर कामावर ही महिला गेली नाही. तरी तिला २१ जानेवारी २०१९ ते २७ जानेवारी २०१९ व २८ जानेवारी २०१९ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पाच - पाच दिवस असे दहा दिवस कामावर उपस्थिती दाखविली गेलीे. दहा दिवसाची १३४० रुपये मजुरी काढण्यात आली.
तथापि, ही महिला २३ मार्च २०१८ पासून आजारी आहे. तिला धड चालताही येत नसतानाही त्या महिलेला रोजगार हमी योजनेच्या कामावर दाखविले.
मात्र त्यानंतर सदर कामाची तक्रार केल्यानंतर त्या रुग्ण महिलेला मोहाडी पंचायत समिती येथे बयानासाठी आणले गेले. मात्र तिची अवस्था पाहून तिला गाडीतच ठेवण्यात आले होते.
सदर प्रकरणाची परिसरात चर्चा सुरु असून पुढे काय होणार याकडे लक्ष लागून आहे.