दिव्यांग मनोहर ठरला स्वच्छतेचा ‘आॅयडॉल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:25 PM2017-12-09T23:25:31+5:302017-12-09T23:25:44+5:30
हातावर आणून पानावर खाण्याइतपत कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यातच एका पायाला अपंगत्व. कुटुंबात पत्नी, मुलगा व मुलगी असा चौघांचा गाढा हाकताना केवळ पत्नीच्या हिमतीवर त्याने घर आणि वैयक्तिक शौचालय बांधून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. आता हा दिव्यांग मनोहर जिल्ह्यात स्वच्छतेचा ‘आयडॉल’ ठरला आहे.
नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हातावर आणून पानावर खाण्याइतपत कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यातच एका पायाला अपंगत्व. कुटुंबात पत्नी, मुलगा व मुलगी असा चौघांचा गाढा हाकताना केवळ पत्नीच्या हिमतीवर त्याने घर आणि वैयक्तिक शौचालय बांधून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. आता हा दिव्यांग मनोहर जिल्ह्यात स्वच्छतेचा ‘आयडॉल’ ठरला आहे.
लाखांदूरपासून १५ कि.मी. अंतरावर किरमिटी हे गाव वसलेले आहे. अवघ्या तेराशे लोकवस्तीच्या या गावात २४५ कुटूंबांचे वास्तव्य आहे. सभोवताल शेत आणि मध्यभागी गाव असलेल्या किरमटीतील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.
याच गावात मनोहर धर्माजी कावळे (३०) यांचे घर आहे. २० बाय २० जागेत त्याचे कौलारू घर आहे. लहानपणी पोलिओमुळे त्याच्या डाव्या पायाला अपंगत्व आले. काठीच्या आधाराने तो चालतो. काठी नसली तर तो चालूही शकत नाही. परंतु अपंग असल्याचे तो स्वत:ला कधी जाणवू देत नाही. काठीचा आधार शरीराला मिळाला तसा पत्नीचा आधार त्याला संसाराला मिळाला आहे. पती दिव्यांग असल्याने संसार कसा चालवायचा याची यत्कींचितही चिंता न करता हे दाम्पत्य मुलांना शिक्षण देत आहेत.
अशातच २०१६ मध्ये किरमटी गावाचा ‘स्वच्छ भारत मिशन’ कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या कुटूंबांकडे शौचालय होते ते वापर करायचे परंतु ज्यांच्याकडे शौचालये नव्हती ते कुटूंब उघडयावर जात असल्याचे दिसून आले. उघडयावर शौचास जाण्यामुळे वातावरण प्रदूषित झाले. त्याहून जास्त अस्वच्छतेचा त्रास महिला पुरूषांना सहन करावा लागत होता. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून गावात शौचालय बांधण्यात येणार असल्यामुळे उघडयावर जाण्याचे चित्र बदलेल या दिशेने ग्राम पंचायतचे पदाधिकारी झपाटले आणि मिशन सुरू झाले.
ग्रामपंचायतच्या यादीत मनोहरचे नाव होते. शौचालय बांधकामाचा त्याला आग्रह करण्यात आला. परंतु अपंगत्व असल्याने शौचालयात कसे बसता येईल, असे त्याला वाटत होते. परंतु उघडयावर शौचासाठी जाताना होणाºया त्रासापेक्षा हा त्रास मोठा नव्हता, हे त्याच्या लक्षात आले. उघडयावर जाण्यामुळे कुटूंबांची जाणारी लज्जास्पद स्थितीचे शल्य पत्नीला होते. राहायला पक्के घर नव्हते. आणि शौचालय बांधायची ही समस्या त्याच्यासमोर होती. त्यामुळे पक्के घर असावे ही इच्छा असूनही पूर्ण कसे होणार? असा प्रश्न त्याच्या समोर होता.
अशातच वडिलोपार्जित हिस्स्यातून मिळालेल्या वाट्यातून या दाम्पत्याने घर बांधकामाचा निर्णय घेतला. छताच्या एका बाजूला टिना तर दुसºया बाजूला कवेलू टाकून घर बांधले. घराच्या एकाच खोलीत चूल आणि मुल असा संसाराचा गाडा सुरू झाला.
अशातच गावात स्वच्छतेचे वारे सुरू झाले. अनुदान मिळणार होते. शौचालयामुळे घराला घरपण मिळणार असल्याने मनोहरने शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. रोजी रोटी करून मिळविलेले पैसे व शासनाकडून दिव्यांगांसाठी मिळणारे अनुदान यातून बचत केलेल्या पैशातून शौचालयाची पायाभरणी केली. काही दिवसातच मनोहरच्या घरासमोर शौचालय उभा राहिले. उघडयावर जाण्यामुळे मनोहरचा त्रास कमी झाला. छोटयाशा गावात मनोहरने शौचालयासाठी घेतलेला पुढाकार व्याख्यानाजोगा आहे. उघड्यावर जाणाºया गावासाठी मनोहर हा आता हागणदारीमुक्त गावाचा आयडॉल ठरला आहे.