दिवाळीत फटाक्यांमुळे होते प्रदूषणात वाढ
By admin | Published: October 30, 2016 12:32 AM2016-10-30T00:32:37+5:302016-10-30T00:32:37+5:30
दिवाळीचा आनंद फटाक्याशिवाय साजरा करता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. मात्र क्षणिक आनंदासाठी आपण लाखमोलाच्या पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत,...
दिवाळी आज : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
भंडारा : दिवाळीचा आनंद फटाक्याशिवाय साजरा करता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. मात्र क्षणिक आनंदासाठी आपण लाखमोलाच्या पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत, या सत्याचा प्रत्येकाला विचार करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या काळात घातक फटाक्यांमुळे वातावरणातील प्रदूषणात अनेक पटींची वाढ होत असल्याचे सर्वेक्षणात समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात हे प्रमाण कमी असले तरी येत्या काही वर्षात महानगरातील प्रदूषणाचा टक्का गाठेल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फटाक्यांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात बारूदचा वापर केला जातो. आतषबाजी आणि आवाज अधिक व्हावा यासाठी काही जड धातूंचाही समावेश केला जातो. पर्यावरण तज्ज्ञांच्या माहितीनुसार, फटाके फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅडमियम व शिशे या धातूंचे उत्सर्जन होते, जे अतिशय धोकादायक आहे.
याशिवाय वातावरणात कॉपर, झिंक, सोडियम, पोटॅशियम अशा नष्ट न होणारे रसायनिक तत्त्वांचे उत्सर्जन होते. हे धातू वातवरणात फिरत राहतात. हे प्रमाण मानवी आरोग्याच्या दृष्टिने घातक ठरते. यामुळे दमा, डोकेदुखी, रक्तदाब वृद्धी, त्वचा रोग व डोळ्यांचे आजार वाढतात.
दमा आजाराच्या रूग्णांना तर दिवाळीच्या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल ठरते. वायु प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणाचा स्तरही वाढतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या फटाक्यांवर बंदी आणली आहे. मात्र सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन केले जाते. या ध्वनीमुळे माणसच नाही तर प्राण्यांनाही आघात सहन करावा लागतो. (शहर प्रतिनिधी)
चिमण्याही होतात गायब
दिवाळीच्या काळात शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय कुत्रे आणि मांजराच्या वास्तव्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होऊन इको-फ्रेंडली आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकल फटाक्यांना चिनी ‘बार'!
चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आले असताना या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात चोरून विक्री होत आहे. हे फटाके विक्रीस सुलभ व्हावे यासाठी त्याच्यासारखे दिसणारे बनावट फटाके बाजारात आले आहेत. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. दिवाळी हा जल्लोष, उत्साहाचा सण. परंतु या पावित्र्याला चिनी फटाक्यांचे गालबोट लागले आहे. या फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. यामुळेच चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आहे.
बाजारपेठा हाऊसफुल्ल
दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, नवी आशा, नवा हुरूप दिसत आहे. महागाई वाढली असली तरी त्याची कुठलीही छाया दिवाळीच्या खरेदीवर पडली नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.