वैनगंगा नदीचे शुद्धीकरण ठरले दिवास्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:14 AM2018-03-23T00:14:15+5:302018-03-23T00:14:15+5:30
अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यासह वनस्पतींचा विळख्यामुळे दूषित पाण्याचा फटका नदीकाठावरील अनेक गावातील नागरिकांना बसत आहे.
देवानंद नंदेश्वर/ इंद्रपाल कटकवार ।
ऑनलाईन लोकमत
भंडारा : अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यासह वनस्पतींचा विळख्यामुळे दूषित पाण्याचा फटका नदीकाठावरील अनेक गावातील नागरिकांना बसत आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज असताना अनेक संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधींकडून केवळ मागणी केली जात आहे. उपाययोजनाअभावी नदी शुध्दीकरण केवळ दिवास्वप्न ठरत आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झालेले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सिंचीत राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाºया नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.
धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्दपासून सुमारे तीस पस्तीस किलोमीटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील बहुतांश महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे प्रत्येकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादन घटले आहे. ढिवर समाज बांधवांच्या रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे.
सत्ताधाºयांना पडला नदी स्वच्छतेचा विसर!
नदीत येणारे नागनदीचे दूषित पाणी स्वच्छ करण्याविषयी तीन वर्षांपासून नेत्यांकडून मागणी करण्यात येत आहे. तर अधिकाºयांकडून पाणी बचतीसह उपाययोजना करण्याचे प्रवचन देण्यात येत आहे. पाण्याचे पूजन केल्याने पाणी बचत व नदीतील घाण शुध्द होणार नाही. जलप्रतिज्ञा, वैनगंगा स्त्रोत्र पठन केल्याने दुषित पाण्यामुळे होणारे आजार पळणार नाही.
पुढाकाराची प्रतीक्षा
नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जाऊ न देता ते पाणी शुद्ध करण्याची गरज आहे. याबाबत ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेवून केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा केली होती. मात्र, निरीच्या हस्तक्षेपानंतरही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.