शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:45 PM2019-03-16T21:45:56+5:302019-03-16T21:46:28+5:30
भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.
चार दशकांपासून भंडारा शहर ते वरठी रोड रेल्वे स्थानकापर्यंत शटल रेल्वे सेवा सुरु करावी अशी भंडारावासीयांची मुख्य मागणी आहे. सन २०१४ मध्ये रेल्वे बोर्डाचे दिल्ली येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी व रेल यात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यावर सखोल चर्चा करण्यात आली होती.
यात भंडारा, जवाहरनगर रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. मात्र फक्त ९ कि.मी. रेल्वे लाईन असलेल्या राजीव गांधी चौक ते भंडारा रोड (वरठी) अशी शटल ट्रेन सुरु करण्याची एकमेव मागणी रेल्वे यात्री समितीने केली होती.
या मागणीवर रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी एक वेळा नव्हे तब्बल तीन वेळा या लाईनची दुरुस्ती नवीनीकरणाचे कार्यही करण्यात आले होते. त्याउपरही रेल्वे रुळावर ट्रॉली चालवून डागडुजी करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात हा मुख्य प्रश्न रेंगाळत राहिला.
दोन दशकांपूर्वी सुरू होता रूळाचा वापर
भंडारातील रेल्वे स्थानक उभारणीची जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु २० वर्षांपूर्वी जवाहरनगर आयुध निर्माणीने या रेल्वेचा वापर संपुष्टात आणल्याचे दिसून येते. रेल्वे मंतालय व संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न निकाली िनघू शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत असल्याचे जाणवते. भंडारा शहर रेल्वे स्थानक स्थापन करण्याची योजना पूर्ण तयार होती. मात्र त्यावेळी रेल्वे बोर्डाने आर्थिक कारण पुढे करून जवाहरनगर ते वरठी रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रस्तावच मागे ठेवला. राज्य शासनाच्या वतीनेही यावर पाठपुरावा करण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सहकार्याशिवाय भंडारात रेल्वे स्थानकाचा प्रश्न निकाली निघू शकणार नाही हीच तेवढी सत्य बाब आहे.
३० कोटींचा खर्च अपेक्षित
काळानुरुप भंडारा शटल रेल्वे निर्मितीचा प्रस्ताव अधांतरी गेल्याने काळानुरुप त्यावर खर्चही वाढत गेला. आधी १० कोटी रुपये खर्चून सदर स्थानक निर्मितीसह रेल्वे लाईनची दुरुस्तीही होऊ शकत होती. मात्र विद्यमान स्थितीत हाच खर्च ३० कोटींच्या घरात पोहचला आहे. राजीव गांधी चौकात रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यास हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक, परिवहन, रॅक पॉर्इंट, गोडाऊन, लहान मोठे व्यवसाय व परिणामी रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक निर्मितीची जागा अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. यावर रेल्वे यात्री समितीने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु महत्वपूर्ण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासह स्थानक निर्मितीचा प्रस्ताव धूळ खात आहे.