देशाची मान खाली जाईल असे कृत्य करु नका
By admin | Published: December 3, 2015 12:46 AM2015-12-03T00:46:11+5:302015-12-03T00:46:11+5:30
जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी.
कार्यशाळेचे आयोजन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहन
भंडारा : जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी. देशाच्या विकासासाठी सर्व भेदभाव विसरुन एकता, अखंडता व बंधुत्वाचा विचार सर्वांपर्यंत रुजविण्याचे काम आपण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य प्रेमसागर गणविर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व इतके बहुआयामी होते की, त्यांना समजून घ्यायला आपल्याला १०० वर्ष लागेल. देशातील सर्वात लांब असलेले हिराकुंड धरण बांधण्याची संकल्पना बाबासाहेबांची होती. सर्वांच्या कामाचे ८ तास असावे, पेन्शन फंड, प्रॅविडंट फंड, प्रसुती रजा, महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेंबांनी काम केलं. जिथे-जिथे त्यांना अत्याचार, असमानता आणि विषमता दिसली त्यासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार व समान न्यायाची तरतूद केली आहे. तरीही अद्याप देशामध्ये ही समानता दिसत नाही आणि त्यासाठी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा लागतो. अशा कायदयाची आपल्याला गरज पडणार नाही, अशी सर्वांची वर्तणूक असावी. तसेच या कायदयाचा गैरवापर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रेमसागर गणविर म्हणाले, जाती, धर्म, वंश या भितींच्या पलिकडे जावून आपल्या गावात एकता टिकून राहिल यासाठी सर्वांनी काम करावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाची सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून करुन घ्यावी आणि कायदयाची जनजागृती तळागाळापर्यंत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेत भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटिल सहभागी झाले होते. या कार्यशाळेत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत पोलिस विभागाद्वारे लावण्यात येणाऱ्या कलमांविषयी पोलिस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर आणि प्राध्यापक पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती वाडिभस्मे यांनी दिली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डि.एन. धारगावे यांनी संचालन विस्तार अधिकारी हुमने यांनी केले. (प्रतिनिधी)